स्थैर्य, सातारा, दि.२०: ट्रक खरेदी करण्याची बतावणी करून थोडीफार रक्कम देवून ट्रकचा अपहार केल्याप्रकरणी एका सराईत भामट्यास सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाने गजाआड केले आहे. आझीम सलीम पठाण रा. रहिमतपूर ता. कोरेगाव असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीय येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
याबाबत माहिती अशी, सातारा तालुका पोलीस ठाण्यात ट्रकचा अपहार झाल्याबाबत परमेश्वर जयसिंग सानप रा. शेंद्रे ता. सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. या गुन्हयामध्ये तपास सुरू असताना अन्य संशयितांकडे चौकशी केली असता या व्यवहारामध्ये आझिम सलीम पठाण मूळ रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा याने हा ट्रक फसवणूक करून अपहार केल्याचे समोर आले. तसेच आझीमने अनेक अशा प्रकारे अनेक ट्रकस्चे अपहार केल्याचे समजून आल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. तो अनेक वेळा पोलीसांना गुंगारा देवून तो निघून जात होता. रविवारी रोजी तो वाढे फाटा येथे एका चारचाकी वाहनातून येणार असल्याची मिळताच सातारा तालुका डी.बी. पथकाने त्याठिकाणी सापळा रचला. त्याठिकाणी तो येताच पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पळून जावू लागला. डी.बी. पथकाने वाहनाने थरारकरित्या पाठलाग करून त्याचं वाहन थांबवले व ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. आरोपी बोलण्यामध्ये अत्यंत पटाईत, तरबेज असल्याने तो तपासात सहकार्य दाखवत नव्हता. तथापि, त्याच्यावर पोलीसांनी प्रश्नाचा भडीमार केल्यानंतर तो बोलता झाला. त्याने गुन्ह्याची कबुली देवून असेच प्रकार इतर ठिकाणी गुन्हे केलयाचे सांगितले.
आरोपीकडे एक अर्धवट नंबरचा ट्रक असल्याने तो ताब्यात घेवून त्याबाबत अधिक तपास चालू आहे. आरोपी फसवणूकीचे प्रकार कसा करतो, याबाबत माहिती प्राप्त झाली असता ती पोलीसही अचंबित झाले. आरोपी हा ट्रकमालकांना भेटून त्यांना बोलण्यातून भूरळ पाडून तसेच व्यवहारापोटी थोडीसी रक्कम अदा करून विश्वासात घेवून सदरचा ट्रक ताब्यात घेत असे. त्यानंतर ट्रकमालकांना काही तरी बहाणा सांगून भेटण्यास तसेच ट्रक देण्यात टाळाटाळ करीत असे. वाहन ट्रक मालकाला कोठे ओळखू नये, याकरिता त्यामध्ये थोडाफार बदल करत असे. ट्रकमालक तक्रार देण्याचे बोलल्यास त्यांना ट्रकाचा माझा काही संबंध नाही. तक्रार दिली तर ट्रकची विल्हेवाट लावण्याची धमकी देत असे. आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याचा खरा चेहरा समोर येताच अनेक तक्रारदारांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. या गुन्ह्याची व्याप्ती आझीम सलीम पठाण रा. रहिमतपूर ता. कोरेगाव असल्याचे इतर तक्रारदार यांना संपर्क करून संबंधित पोलीस ठाणेस तक्रार देण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
त्याबाबत इचलकरंजी पोलीस ठाणेस गुन्हा नोंद झालेली माहिती प्राप्त झाली आहे. तसेच त्याने इतर जिल्हयामध्ये ट्रकांचे अपहार केल्याची माहिती समोर येत आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सजन हंकारे, डी.बी. पथकातील दादा परिहार, पो.ना. सुजीत भोसले, पो. ना. हेमंत ननावरे, पो. कॉ. सागर निकम, पो. कॉ. सतीश पवार, पो. कॉ. नितीराज थोरात, पो. ना. निलेश जाधव, पो. ना. उदयसिंह पावरा यांनी केलेली आहे.