दैनिक स्थैर्य । दि.१३ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा मुख्य रस्त्यावर दिड महिन्यांपूर्वी ल मेरिडिअन हॉटेलनजीक रानातून जनावरे घेऊन मुख्य रस्त्यामार्गे घरी परतत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बाबुराव जनू डोईफोडे वय ६५ रा. देवी चौक, (सांगलीकर बांगला) महाबळेश्वर यांचा दुर्दैवी अंत झाला होता. या अपघाताचा तपास पोलीस प्रशासकडून सुरु होता. तपासाअंती गणपत कदम उर्फ गणपत वागळे रा. महाबळेश्वर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचे बोलेरो वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाबुराव डोईफोडे हे नेहमीप्रमाणे जनावरे चरण्यासाठी रानामध्ये घेऊन गेले होते. अंधार पडल्याने दि. २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास सर्व जनावरे घेऊन ते मेढा – सातारा या मुख्य रस्त्यामार्गे घराकडे परतत असताना ल मेरिडिअन या हॉटेलनजीक पाठीमागुन भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. याअपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापद झाली व उपचारांआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार तुकाराम बबन शिंदे यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. महाबळेश्वर पोलिसांनी मृत बाबुराव जनू डोईफोडे यांच्या अपघाताचा तपास सुरु केला. येथील अंजुमन हायस्कुल ते माचूतर तसेच ल मेरिडियन हॉटेल परिसरातील सिसिटीव्ही फुटेजची पाहणी करण्याबरोबरच साक्षीदारांकडून देखील माहिती गोळा करण्यात येत होती. अपघातावेळी या रस्तावरुन एकूण तिन वाहने गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या तीन पैकी दोन जणांची चौकशी करून सोडून देण्यात आले तर वाहन चालक गणपत कदम उर्फ गणपत वागळे रा. महाबळेश्वर याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने या अपघाताची कबुली दिली तर त्याचे बोलेरो हे वाहन जप्त केले आहे.
या अपघात प्रकरणाच्या तपासात पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. नवनाथ शिंदे, सलीम सय्यद यांनी विशेष भूमिका बजावली आहे.