दैनिक स्थैर्य । दि.०७ एप्रिल २०२२ । कराड । चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने बिगर परवाना देशी विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस कराड तालुका पोलिसांकडून अटक करण्यात आली. यामध्ये एकूण 1 लाख 1 हजार 672 रुपयांचा मुद्देमाल वाहनांसह जप्त करण्यात आला आहे. धनंजय कुंडलिक भोसले (वय 43, रा. शिरसी, ता. शिराळा, जि. सांगली) असे अटक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. 5 रोजी 4.55 वाजण्याच्या सुमारास वाठार, ता. कराड गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गनजीकच्या ओम साई लेडीज कलेक्शन समोरून व वाठार ते कासेगाव सर्व्हिस रोड वरून टेम्पोतून अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती रेठरे पोलीस दुरुक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव यांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहा. पोलीस उपनिरीक्षक संपतराव जाधव, प्रशांत हक्के, पोलीस नाईक विजय म्हेत्रे यांनी कारवाई करून धनंजय भोसले यास मुद्दे मालासह अटक केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या छोटा हत्ती वाहनांमध्ये देशी दारूच्या बाटल्या, हिरव्या काचेच्या टूबर्ग बिअरच्या बाटल्या, मॅकडॉन नं. एकच्या सीलबंद बाटल्या व गोवा जीन लेबलच्या सीलबंद बाटल्या असा सुमारे 1 लाख 1 हजार 672 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक संपतराव जाधव करीत आहे. ही कामगिरी कराड तालुका पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली