स्थैर्य, निढळ, दि.२४: बुध येथील दुहेरी खून प्रकरणातील गेली सहा वर्षे फरारी असलेल्या रायसिंग शंकर जाधव (रा. करंजओढा, बुध, ता. खटाव) या आरोपीला पोलादपूर येथे जाऊन कोरेगाव डीवायएसपी पथकाने जेरबंद केले आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंजओढा, बुध या गावामध्ये सन 2015च्या स्वातंत्र्य दिनी दिवसाढवळ्या दुहेरी खूनाची घटना घडली. या प्रकरणातील खून करून फरार असलेला आरोपी रायसिंग शंकर जाधव हा पोलादपूर येथे असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्याने कोरेगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या अधिनस्त पथकाने पोलादपूर येथे जाऊन मोठ्या शाताफीने रायसिंग जाधव याला पोलादपूर पोलिस ठाण्याच्या सहकार्याने जेरबंद केले.
कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल साहिल झारी व पोलीस कॉन्स्टेबल हेमंत शिंदे यांनी या कारवाईत सहभाग घेऊन रायसिंगच्या मुसक्या आवळल्या. बुध येथील दुहेरी खूनाच्या गुन्ह्यातील 11 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. रायसिंग जाधव हा गेल्या सहा वर्षापासून वारंवार ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. या कामगिरीबद्दल जिल्हा पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलिस अधिक्षक धीरज पाटील, कोरेगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे व पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय बोंबले यांनी पथकाचे कौतुक केले आहे.