स्थैर्य, फलटण : बँक ऑफ इंडिया फलटण शाखेतील नेट बंद पडल्याने ग्राहकांना पैसे मिळण्यात अडचणी येत असून हा प्रकार वारंवार घडत असल्याने शहर आणि ग्राणीण भागातून पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांची मोठी कुचंबना होत आहे. काल (मंगळवार) सकाळी बँकेचे कामकाज सुरु झाले पासून नेट बंद असल्यामुळे खात्यावर पैसे असूनही पैसे मिळत नसल्यामुळे काही नियोजन करुन ग्रामीण भागातून आणि शहर व परिसरातून आलेल्या ग्राहकांची मोठी अडचण झाली होती. लाॅक डाऊन शिथील करुन जिल्हाधिकारी यांनी बँक कामकाजाची वेळ वाढवली पण या बँकेची वेळ सकाळी ९ ते १२ असल्याने संबंधीत यंत्रणेने लक्ष घालुन शहरातील बँकांची प्रत्यक्ष कामकाजाची वेळ वाढविण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील खातेदार बँक कामकाजासाठी पूर्व नियोजन करुन येथे येतात पैसे मिळाले नाहीत तर वेळ, श्रम, पैसा वाया जात आहे. सबंधीतानी दखल घेऊन कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.