दैनिक स्थैर्य । दि. ०९ फेब्रुवारी २०२३ । सातारा । जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात तब्बल १७६५ नळ पाणीपुरवठा योजनांना मंजूर मिळाली आहे. त्यासाठी ८१६ कोटींचा निधी मंजूर आहे. यातील ८१० योजनांचा बुधवारी, दि. ८ रोजी सकाळी ११ वाजता ई भूमिपूजन कार्यक्रम पार पडणार आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी आज दिली.
सीईओ खिलारी यांनी आज पत्रकार परिषदेत विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रकल्प संचालक चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता श्रीमती आवटी, मुख्य लेख व वित्त अधिकारी विकास सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली बडदे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे आदी उपस्थित होते.
ज्ञानेश्वर खिलारी म्हणाले, केंद्र शासन पुरस्कृत सुरु असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमानुसार २०२० पासून जल जीवन मिशनमध्ये पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना २०२४ पर्यंत ‘हर घर नल से जल’चे उद्दिष्ठ ठेवले आहे. या मिशनअंतर्गत जिल्ह्यात १७६५ योजनांना मंजुरी दिली आहे. त्याची रक्कम ८१५ कोटी ९२ लाख आहे. त्यापैकी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेकडून ८१० योजनांसाठी ५३८ कोटी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन सातारा विभागाकडील ३४ योजनांसाठी ४७३ कोटी तसेच कराड विभागाकडील १५ योजनांसाठी १८८ कोटींचा निधी देण्यात येत आहे.
बुधवारी जिल्ह्यातील ८१० योजनांचे ई भूमिपूजन होणार आहे. त्यास मंत्री पाटील, मंत्री देसाई यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, एमजीपीचे मुख्य अभियंता आदी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या बहुद्देशीय सभागृहात होणार आहे. यावेळी कराड तालुक्यातील १३१, कोरेगावातील ५५, खंडाळ्यातील ४३, खटावमधील ६७, जावळीतील ७६, पाटणमधील ६५, फलटणमधील ८७, महाबळेश्वरातील ५०, माणमधील ४६, वाईतील ८७, सातारा तालुक्यातील १०३ असा ८१० योजनांचे भूमिपूजन होणार आहे. तसेच सातारा तालुक्यातील देगाव, खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे प्रत्यक्षात भूमिपूजन होईल, असेही ज्ञानेश्वर खिलारी यांनी सांगितले.