दैनिक स्थैर्य । दि. २० फेब्रुवारी २०२२ । सातारा । वातावरणातील बदलाचे परिणाम जास्त करुन शेतकरी भोगत आहेत. अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. वातावरणातील बदलानुसार शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करुन प्रत्येकानेही जीवन शैलीत बदल केला पाहिजे, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
वातावरणातील बदलाचे परिणाम प्रत्येकाला भोगावे लागत आहे. राज्यात जवळपास 51 ते 53 टक्के शहरीकरण झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिक शहरी भागात स्थलांतरीत होत आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात वनसंपदा वाढली पाहिजे, जंगले राहिले पाहिजे तसेच खेळाची मैदानेही राहिली पाहिजेत. वातावरणातील समातोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन योगदान द्यावे, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
सौउ ऊर्जेचा वापर, सार्वजनिक वाहतुक पर्यावरण पुरक वाहनांची खरेदी केली पाहिजे. तसेच पडणाऱ्या प्रत्येक पाऊसाचा थेंब हा जमिनीत मुरला पाहिजे. तसेच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ठिबकचा वापर केला पाहिजे. महानगर पालिका, नगर परिषदा व ग्रामपंचायतींनी कचरा व्यवस्थापनावर काम केले पाहिजे. शासनामार्फत नद्यांच्या स्वच्छतेच्या कामाबरोबर वृक्ष संपदा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. यात सर्वांनी सहभाग नोंदवावा. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व लायन्स क्लबने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जे काम हाती घेतले आहे त्याचा इतरांनी आदर्श घ्यावा, असेही आवाहन श्री. ठाकरे यांनी यावेळी केले.
यावेळी खासदार वंदना चव्हाण, कुलगुरु मदनगोपाल वार्षणेय, डॉ. अविनाश पोळ, डॉ. गुरुदास नुलकर, मृण्मयी देशपांडे यांनीही परिसंवादामध्ये मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.