दैनिक स्थैर्य । दि. २४ डिसेंबर २०२१ । सातारा । तमाशा कलावंत कमल कराडकर यांच्या तमाशा कलावंतांचा टेम्पोला (एम.एच ११ एम ४५८२) बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कासच्या घनदाट जंगलात अपघात झाला. महाबळेश्वर तालुक्यातील गोगवे व वेंगळे या ठिकाणी तमाशा कार्यक्रम आटूपुन कराडकडे परतत असताना अंधारी (ता. जावली) गावच्या हद्दीत हा अपघात झाला.
यावेळी वाहनात एकूण १५ ते २० कलाकार होते. यातील पाच जण जखमी झाले. त्यांना बामणोली आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिणकेने सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती बामणोली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मोरे यांनी दिली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व तमाशा कलाकार गोगवे, वेंगळे येथील कार्यक्रम झाल्यानंतर कराडच्या दिशेने परतत होते. अंधारी गावच्या वरच्या बाजूला घाट रस्त्यावर वळणावर आल्यावर गाडीतील डिझेल संपल्याने चालकाने टेम्पो उताराच्या बाजूस लावला.त्यानंतर त्यांनी बामणोली येथे जाऊन डिझेल आणले.
डिझेल टेम्पोत टाकून परत कराडकडे जाणार होते. चालकाने टेम्पाे सुरु केला. मागे तीव्र उतार असल्याने चालकाला टेम्पाेचा ब्रेक लागला नाही. टेम्पाेला अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत काेणतीही जीवित हानी झाली नाही.