दैनिक स्थैर्य । दि. २८ फेब्रुवारी २०२२ । वडूज । माळशिरस तालुक्यातील युवकाचा तडवळे येथे दुचाकीवरून पडुन मृत्यु झाला.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहीती अशी की, माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी येथिल युवक रामचंद्र विजय चव्हाण (वय 38) हा ड्रायव्हींगचा व्यवसाय करत होता. दुचाकी (क्र. एम.मच.42 ए.बी. 7108) देण्यासाठी तो कोल्हापुर येथे निघाला होता. शिंदेवाडी ते कोल्हापुर असा रात्रीचा प्रवास करत होता. तडवळे ता. खटाव येथे आल्यानंतर येथील खाडे वस्तीवरील पुलावरुन कठडा तोडुन दुचाकी खाली पडली आणि दुचाकी पुलाशेजारी असलेल्या झाडीत गेली व पडली. दुचाकीबरोबर युवकही झाडीत जावून पडला आणि युवकाचे डोके दगडावर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला.
हा अपघात रात्रीचा घडला तसेच दुचाकी आणी युवक झाडीत पडल्याने कोणच्याही निदर्शनास आले नाही. परिसरात दुर्गंधी सुटल्याने या अपघाताची माहिती मिळली. दि. 22 रोजी या युवकाचा भाउ प्रविण चव्हाण याने गाडीचे व भावाचे वर्णन असलेला मेसेज व्हॉटसप वरती पाठविला होता. माझा भाउ रामचंद्र चव्हाण हा अद्यापही घरी आलेला नाही, कोणास आढळल्यास संपर्क करावा असा त्याने उल्लेख केला होता. परंतू पाच दिवसातच त्याची अपघाताची बातमी मिळाली. त्यामुळे चव्हाण कुटुंबीयांना धक्का बसला. मयत रामचंद्र चव्हाण याच्या पश्चात आई, पत्नी, चार वर्षाची मुलगी व दहा वर्षाचा मुलगा, भाउ असा परिवार आहे. सदर घटनेची नोंद वडूज पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दिक्षित, हवालदार वाघमारेएस. एल., मल्हारी हांगे करीत आहे.