दैनिक स्थैर्य । दि.१४ जानेवारी २०२२ । फलटण । फलटण – सातारा रोडवरील फरांदवाडीनजिक असलेल्या तावडी फाटा येथे वारंवार छोटे – मोठे अपघात घडत असल्याने अपघातांची मालिका रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना कराव्यात; अशी मागणी या परिसरातील स्वरा नंदन सहकारी गृह निर्माण संस्थेतील रहिवाशांनी निवेदनाद्वारे केली आहे. अपघातांची वाढत्या संख्या व जिवीत हानीची गंभीर शक्यता लक्षात घेवून सावर्जनिक बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना न केल्यास परिसरातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे; येथील रहिवासी अमर शेंडे यांनी सांगितले.
याबाबत फलटण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या फलटण – सातारा रोड वरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून या रस्तावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यात अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. या रत्यावर फलटण कडून सातार्याकडे जाताना डाव्या बाजूला आमची रहिवासी सोसायटी आहे व उजव्या बाजूला एक शाळा आहे. सध्या या सोसायटीमध्ये अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. या सर्वांनाच कामानिमित्ताने या मुख्य रस्त्यावरून जावे लागते. शिवाय परिसरातील शाळेमध्ये येणार्या विद्यार्थी, पालक विशेषत: महिला वर्गार्चीही या रस्त्यावर वर्दळ असते. बरेच विद्यार्थी सायकलवरून ये-जा करीत असतात. या मुख्य रस्त्यावरील भरधाव वाहतुकीमुळे या रस्त्यावरुन ये-जा करताना जीव मुठीत घेऊनच नागरिक जात असतात.
सदर रस्त्यावर अपघात होऊ नयेत म्हणून नियमानुसार कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. रस्त्यावर मधोमध व दोन्ही बाजूला पांढरे पट्टे नाहीत. सोसायटी समोर काही अंतरावर शासकीय नियमानुसार असणारे गतिरोधक दोन्ही बाजूस आवश्यक आहेत ते नाहीत. तसेच लोकवस्ती बाबत फलक लावलेले नाहीत. संभाव्य मोठी दुर्घटना टाळण्यासाठी या उपाययोजना करणे आवश्यक असून त्या तात्काळ करण्यात याव्यात, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
सदरच्या निवेदनावर अमर शेंडे, विशाल जगताप, अतुल पेटकर, ओंकार गोंजारी, अनिल पालखे, ज्योती जाधव आदींच्या स्वाक्षर्या आहेत.