दैनिक स्थैर्य । दि. २६ डिसेंबर २०२१ । सातारा । ग्वाल्हेर-बेंगलोर महामार्गावर माजगाव फाटा (ता.सातारा) येथे भरधाव वेगाने निघालेल्या बी.एम.डब्ल्यू कारने पुढे असलेल्या होंडा अमेझ कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात होंडा कारमधील प्रवासी जखमी झाले.शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. बी.एम.डब्ल्यू कारचालक दारूच्या नशेत कार चालवत असल्याने हा अपघात झाला.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील धनंजय गोविंद जुन्नरकर हर त्यांच्या कुटुंबियांसह लग्नकार्यासाठी कोल्हापूर येथे गेले होते.लग्नकार्य आटोपल्यावर सायंकाळी कुटुंबियांसह ते त्यांच्या होंडा अमेझ कारने पुन्हा पुणे येथे जाण्यास निघाले होते.त्यांची कार माजगाव फाटा येथे आली असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या बी.एम.डब्ल्यू कारने त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली.
या धडकेने होंडा कारने महामार्गावरच दोन पलट्या घेऊन महामार्गालगतच उलट्या अवस्थेत थांबली.तर बी.एम.डब्ल्यू कार थेट महामार्गालगतच्या उसाच्या शिवारात जाऊन थांबली.या अपघातात होंडा कारमधील सौ.दीपाली धनंजय जुन्नरकर या जखमी झाल्या.तर अन्य लोकांना किरकोळ दुखापत झाली.स्थानिक ग्रामस्थांनी पलटी झालेल्या कारमधील प्रवाश्याना बाहेर काढले.
बी.एम.डब्ल्यू कारचालक सुहास श्रीकांत कुलकर्णी ( रा.डोंबिवली मुंबई) हा दारूच्या नशेत असल्याचे निदर्शनास आले.अपघातात दोन्ही कारचे चांगलेच नुकसान झाले आहे.या अपघाताची फिर्याद धनंजय जुन्नरकर यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास अपघात विभागाचे हवालदार विजय देसाई करत आहेत.