स्थैर्य, वाई, दि.५: भरधाव वेगाने साताऱ्याहून वाईकडे येणाऱ्या मोटारीने साताराकडे जाणाऱ्या दुचाकीला बावधन ओढा (ता वाई) परिसरात जोरदार धडक दिली.या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. मोटार चालकावर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून जखमींना उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताचे क्षण कमेऱ्यात कैद झाली आहेत.
वनिता प्रवीण भोसले(वय ३५ ,केसरकर पेठ सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या व त्यांचे पती प्रवीण हे दोघे दुचाकी वरून रविवारी दुपारी वाईला किसन वीर महाविद्यालयात पुस्तके आणण्यासाठी गेले होते.प्रवीण हे गाडी चालवत होते.वनिता या चार महिन्यांच्या गर्भवती आहेत. तेथील काम झाल्याने परत सातारच्या दिशेने निघाले होते.बावधन ओढ्या नजीक दोन वाजण्याच्या सुमारास साताऱ्याकडून वाईकडे येणाऱ्या मोटारीने दुचाकीला जोरदार धडक दिली.त्यात वनिता व प्रवीण हे दोघेही दुचाकीवरून लांब फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामस्थांनी सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मोटार चालक राजेंद्र रामचंद्र रसाळ(रा.सहयाद्रीनगर) याच्यावर वाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक सुभाष धुळे हे तपास करत आहेत.