दैनिक स्थैर्य । दि. १२ मे २०२२ । मुंबई । जागतिक कीर्तीचे कलाकार, तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांनी मुंबई विद्यापीठातर्फे दिलेल्या पदवीचा स्वीकार करणे हा विद्यापीठाचा मोठा सन्मान असून या पुरस्कारामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित विशेष दीक्षान्त समारंभात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
संगीत क्षेत्रात व इतर विद्याशाखांमध्ये आपला शिष्य आपल्याही पुढे जावा असे गुरुजनांना वाटते, दुःखद प्रसंगी संगीत मनाला सांत्वन देते ही संगीताची शक्ती आहे. निसर्गाने प्रत्येकाला काही ना काही प्रतिभा दिलेली असते. या प्रतिभेला शिस्त, एकनिष्ठपणा व परिश्रमातून फुलवता येते, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आंतरशाखीय अध्ययनास चालना देण्यात येत असून यानंतर विद्यार्थ्यांना विज्ञानासह संगीतदेखील शिकण्याची व्यवस्था असेल असे सांगून या धोरणाची अंमलबजावणी चांगली झाली तर विद्यापीठांमधून झाकीर हुसेन, शशिकांत गरवारे यांच्याप्रमाणे प्रतिभावंत विद्यार्थी निर्माण होतील असे राज्यपालांनी सांगितले. पंतप्रधान मोदी ‘मेक इन इंडिया’चे आवाहन करीत आहेत. मात्र गरवारे समूहाने 80 वर्षांपूर्वीच ‘मेक इन इंडिया’ ची सुरुवात केली होती असे राज्यपालांनी सांगितले.
लता मंगेशकर संगीत महाविद्यालयासाठी १०० कोटींची तरतूद : उदय सामंत
ज्या झाकीर हुसेन यांचा तबला ऐकून आपण लहानाचे मोठे झालो त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसावयास मिळणे हा आपला बहुमान असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या जयंतीच्या दिवशी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लता दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय सुरु होईल, असे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. या महाविद्यालयासाठी शासनाने 100 कोटी रुपयांची तरतूददेखील केली असल्याचे त्यांनी सांगितले. या महाविद्यालयातील अभ्यासक्रम ठरविण्यासाठी झाकीर हुसेन, शंकर महादेवन, उषा मंगेशकर यांनी मदत करावी असे त्यांनी सांगितले. राज्यातील शैक्षणिक क्षेत्र प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली काम करू असेही त्यांनी सांगितले.
विद्यापीठाची पदवी हा कृपाप्रसाद : उस्ताद झाकीर हुसेन
जगातील सर्वाधिक जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठाने दिलेली पदवी हा आपण थोरामोठ्यांचा कृपाप्रसाद आहे, असे समजतो व तो सन्मान आपले वडील व गुरु उस्ताद अल्लारखाँ यांना समर्पित करतो असे सत्काराला उत्तर देताना उस्ताद झाकीर हुसेन यांनी सांगितले.
जीवनात गुरु होण्याचा प्रयत्न न करता उत्तम शिष्य होऊन राहा असा सल्ला आपल्याला वडिलांनी दिला होता व तो आपण पाळत आहोत असे सांगून आज अनेक उत्तमोत्तम संगीतकार असून आपण केवळ त्यापैकी एक असल्याचे विनम्र उद्गार झाकीर हुसेन यांनी यावेळी काढले.
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात पार पडलेल्या विशेष दीक्षान्त सोहळ्यात उद्योगपती शशिकांत गरवारे यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट.) ही पदवी देण्यात आली तर रसायन शास्त्रातील योगदाबाबद्दल वैज्ञानिक डॉ मुकुंद चोरघडे यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शशिकांत गरवारे उपस्थित राहू शकले नाही. त्यांची कन्या मोनिका गरवारे यांनी पदवीचा स्वीकार केला.
कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात स्वत:ला झोकून देऊन कार्य केल्यास तो व्यक्ती घडतो आणि दुसऱ्यालाही घडवतो. भारतीय संगीत आज जागतिक पातळीवर पोहोचले आहे. उस्ताद झाकीर हुसेन हे संगीत क्षेत्रातील त्यांचे कार्य आणि अंगभूत गुणांमुळे स्वयंभू राजे बनले.
विशेष दीक्षान्त समारंभानंतर प्रसिद्ध गायक शंकर महादेवन व इतर विशेष कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी, संगीत क्षेत्रातील शंकर महादेवन, कुलसचिव सुधीर पुराणिक, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, पं. विभव नागेशकर, सत्यजित तळवलकर, राकेश चौरसिया, विजय घाटे तसेच विविध कलाकार व विद्यापीठाचे प्राचार्य, विभागप्रमुख व शिक्षक उपस्थित होते.