स्थैर्य, सातारा, दि. 20 : सातारा जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. मागील काही दिवसांमध्ये मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सूनच्या पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याने आपल्या पारंपरिक खरीप पिकांच्या पेरणीची कामे हाती घेतली आहेत.
गुरुवारी संततधार लावलेल्या पावसाने मात्र उसंत घेतली. काही वेळ सूर्यदर्शन, काही वेळ ढगाळ वातावरण असले तरी दिवसभरात पाऊस मात्र पडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामीण भागात पेरण्यांना प्रारंभ झाल्याचे चित्र होते.
सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील भाताच्या 49 हजार हेक्टर क्षेत्रापैकी 22 हजार हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली आहे तर ज्वारीच्या पिकाचीही 50 टक्के भागावरील पेरणी झाली आहे. त्यासोबतच सोयाबीन आणि भुईमूग या दोन्ही पिकांची प्रत्येकी 43 टक्के पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. गतवर्षी जूनचा शेवटचा आठवडा संपला तरी मॉन्सूनचे आगमन झाले नव्हते. त्यामुळे पेरणीची आणि शेतीशी संबंधित सर्व कामे रखडली होती. जून अखेरीस ही केवळ 6 टक्केच पेरणी पूर्ण झाली होती. यावर्षी मात्र जून अखेरपर्यंत पेरणीशी संबंधित कामे पूर्ण होण्याचा अंदाज आहे.