दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२१ । नाशिक । लासलगाव शहराच्या बाहेरून जात असलेल्या बाह्य वळण रस्त्याचे व उड्डाणपुलाच्या कामास अधिक गती देऊन तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
पालकमंत्री छगन भुजबळ हे आज येवला मतदारसंघातील लासलगाव दौऱ्यावर असताना त्यांनी आज लासलगाव बाह्य वळण रस्ता व उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना या कामास अधिक गती देण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी लासलगाव ग्रामपंचायतचे सरपंच जयदत्त होळकर, प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे, उपविभागीय अभियंता गोसावी, अभियंता गणेश चौधरी,लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ,यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, बाह्य वळण रस्त्याच्या कामामध्ये नव्याने भूसंपादन करावयाच्या जागेबाबत तातडीने शेतकऱ्यांचे संमतीपत्र घेऊन याबाबत जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन तात्काळ मोबदला देण्याबाबत निर्णय घेण्यात यावा. त्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून येथील बाधित शेतकऱ्यांचे असलेले प्रश्न तातडीने सोडविण्यात यावे असे आदेश प्रांताधिकारी यांना दिले.
राहिलेले भूसंपादन वगळता इतर बाह्य वळण रस्त्याचे व उड्डाण पुलाच्या कामांना गती देऊन ते पूर्ण करण्यात यावे. तसेच परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी. ही सर्व कामांची प्रक्रिया एक महिन्याच्या आत पूर्ण करण्यात यावी. तसेच याबाबत पुन्हा महिनाभरात कामाची पाहणी करण्यात येईल. त्यावेळी कामाची प्रगती दिसली पाहिजे अशा सूचनाही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.