ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या कामाला गती द्यावी; बाजार समित्या काही दिवस बंद ठेण्याबाबत लोकप्रतिनिधीशी चर्चा करणार – पालकमंत्री छगन भुजबळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नाशिक, दि. ०८: कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचा साठा करण्यावर भर देण्यात येऊन ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या कामाला गती देण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट आणण्यासाठी बाजार समित्या काही दिवस बंद ठेवण्याबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

भुजबळ फार्म येथे जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधिक्षक ग्रामीण सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त माधुरी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, रुग्णसंख्या कमी होण्याची परिस्थिती दिलासादायक असली तरी ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर कडक निर्बंध लावण्याबाबत नियोजन करण्यात येवून प्रतिबंधात्मक क्षेत्र वाढविण्यात यावे. तसेच  प्रतिबंधित क्षेत्रातील नियमावलीचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जिल्ह्यात बेड, ऑक्सिजन आणि रेमडिसिव्हीरचा पुरवठा सुरळीत असून रेमडिसिव्हीचा गरजेपेक्षा अधिक वापर टाळण्यात यावा. ग्रामीण भागातील कोविड रुग्णालयात आवश्यक ते मुनष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील 18 ते 44 वयोगटातील लसीकरण मोहिमेत कुणी वंचित राहणार नाही यासाठी लसीकरणाबाबत योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जिल्ह्यातील कोरोनास्थितीची माहिती देतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कोविड केअर सेंटर अधिक्ष सक्षम करण्याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे. जेणे करून रुग्णांना त्वरीत व वेळेत उपचार मिळणे शक्य होईल. तसेच सर्व कोविड रुग्णालयांचे ऑक्सिजन वापराबाबतचे ऑडिट पूर्ण करण्यात आले असून रेमडेसिव्हीरचा पुरवठा सर्व रुग्णालयांना सुरळीतपणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. याचसोबत जिल्ह्यातील ऑक्सिजनचा उपलब्ध साठा तसेच सर्व यंत्रणांकडून कोरोना संक्रमण नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती यावेळी जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी पालकमंत्री यांना सादर केली.


Back to top button
Don`t copy text!