दैनिक स्थैर्य । दि. ०३ डिसेंबर २०२१ । सातारा । जल जीवन मिशनचे ‘हर घर जल’ अर्थात प्रत्येक घरी पाणी हे उद्दीष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी यंत्रणेने गांभिर्याने प्रयत्न करावेत, या कामाला कोणत्याही परिस्थितीत गती द्यायची आहे. असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा , उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, ग्रामीण पाणी पुरवठा जि.प.चे कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे व संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, या अभियानांतर्गत प्रत्येक घरी पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना, जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनुरुज्जीवन, क्षमतावाढ किंवा दुरुस्ती अशी कामे प्राधान्याने हाती घ्यायची आहेत. आतापर्यंत या कामांचे विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर होणे आवश्यक होते. प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता देऊन निविदा प्रक्रिया राबवण्यासह कार्यादेश दिलेली कामे गतीने पूर्ण करणे अपेक्षित आहे. या कामांना गती देऊन ती पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या अभियंत्यांनी गांभिर्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेही त्यांच्याकडील प्रस्तावित आणि पुनुरुज्जीवनाच्या नळ पाणी पुरवठा योजनांचे प्रकल्प अहवाल, प्र.मा. तसेच तांत्रिक मान्यताबाबतची कार्यवाहीत विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी यावेळी अभियानाबाबत माहिती दिली. या अभियानांतर्गत जिल्ह्यात नव्या व जुन्या पुनुरुज्जीवनाच्या अशा एकूण 1763 पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहेत. यापैकी 215 योजनांचे भूजल सर्वेक्षण विभागाचे (जीएसडीए) जलस्रोत सर्वेक्षण झाले आहे. 1354 चे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार झाले असून 780 प्रकरणात तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 366 कामे प्रगतीत असून 227 पूर्ण झाली आहेत. या कामांना वेग देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्याचे जलजीवन मिशन अंतर्गत नळजोडणीचे एकूण उद्दीष्टांपैकी 82 टक्के उद्दीष्ट पूर्ण करण्यात आले असून, सन 2021-22 साठीचे 80 हजार उद्दीष्टांपैकी 17 हजार 848 इतके नळजोड पूर्ण करण्यात आले असून उर्वरित नळजोड मार्च 22 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल शिंदे यांनी जलजीवन मिशनचा सादरीकरणाद्वारे आढावा दिला.