भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदु मिल येथील स्मारकाच्या कामाला गती द्या – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. १५: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदु मिल येथील स्मारकाच्या कामाला गती देऊन विहित कालावधीत या स्मारकाचे काम पूर्ण व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश सामाजिक न्याय  व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदु मिल येथील स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासंदर्भात मंत्रालयातील दालनात दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली.

यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी कोरोना स्थितीमुळे प्रकल्पाच्या कामांचा मूळ कालावधी वाढला आहे. त्यामुळे स्मारकाच्या कामांना गती देऊन ते विहित वेळेत पूर्ण करावे. स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी तसेच पुतळा प्रतिकृती अंतिम करण्यासंदर्भातील गठित समितीचे लवकरच पुनर्गठन करण्यात येईल, असेही श्री.मुंडे यांनी सांगितले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

वास्तुशास्त्रविशारद यांनी गुणवत्तापूर्ण व पारदर्शक कामावर भर द्यावा :- सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदु मिल येथील स्मारक हे जागतिक दर्जाचे असणार आहे. या स्मारकाकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे. हे लक्षात घेऊन काम दर्जेदार व्हावे यासाठी संबंधितानी लक्ष द्यावे. तसेच कामाच्या सद्यस्थितीची माहिती दर्शनी भागात लावावी, अशा सूचना राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिल्या.

यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवास यांनी कामांच्या सद्यस्थितीसंदर्भात माहिती दिली. प्रवेशद्वार इमारत, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, प्रेक्षागृह, स्मारक इमारत, बेसमेंट वाहनतळ, स्मारक इमारत व पुतळा वगळता प्रकल्पाचे अंदाजित काम ४८ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्यासाठी  सुरू असलेल्या कार्यवाहीबाबतही सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. स्मारकाचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. स्मारक इमारत फाऊंडेशनची सद्यस्थिती सचित्र माहितीसह यावेळी बैठकीत सादर करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!