स्थैर्य, सातारा, दि. ११ : छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात होत असलेल्या 250 खाटांच्या कोविड हॉस्पिटलच्या तयारीला वेग आला आहे. कोविड हॉस्पिटलमधील शस्त्रक्रिया व व्यवस्थापन खासगी एजन्सीकडे देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच वैद्यकीय साहित्य व गॅस पाइपलाइनसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या रोखून बाधितांवर उपचार होण्यासाठी जिल्हास्तरावर पुण्याच्या धर्तीवर कोविड रुग्णालय करण्याचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या नव्या इमारतीत होत असलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये 200 ऑक्सिजन बेड आणि 50 आयसीयू बेडची व्यवस्था केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी पुण्याला जाऊन त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलची पाहणी केली होती. त्यानंतरही पालकमंत्री व गृह राज्यमंत्री छत्रपती शिवाजी संग्रहालयाला भेट दिली होती. मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत हॉस्पिटल उभारणीसाठी आवश्यक असणार्या बाबींची पूर्तता करण्यावर चर्चा झाली होती. बांधकाम खात्याकडून तसा अहवाल मागवण्यात आला होता. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. सातार्यात सुरु होत असलेल्या कोविड हॉस्पिटमधील शस्त्रक्रिया आणि व्यवस्थापनाची जबाबदारी खाजगी एजन्सीवर सोपवली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी गॅस पाइप बसवाव्या लागणार आहेत. मेडिकल गॅस पाइपलाइन यंत्रणा बसवण्याच्या कामाची निविदा जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हास्तरावर उपचाराच्या अनुषंगाने सर्व सोयींयुक्त हॉस्पिटल उभारण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा काम करत आहे. हे कोविड हॉस्पिटल सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याची डेडलाइन देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालय उपजिल्हा रुग्णालये तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलची संख्या कमी पडू लागल्याने प्रशासनाने काही खाजगी हॉस्पिटल्सही ताब्यात घेतली आहेत. मात्र वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आणखी रुग्णालये तसेच ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासणार आहे. कोविड हॉस्पिटल उभारण्याची डेडलाइन 20 दिवसात संपत असून प्रशासनाने त्या दृष्टीने नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यात खाजगी तसेच सरकारी डॉक्टरांची संख्या जास्त आहे. मात्र कोरोना साथरोग नियंत्रणात खाजगी डॉक्टरांनी योगदान देण्याची गरज आहे. दोन महिन्यांपूर्वी काही डॉक्टरांनी मानधनाची अपेक्षा प्रशासनाकडे केली होती. मात्र जिल्ह्यावर संकट कोसळल्याने मानधनाशिवाय रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे. शासन, प्रशासन जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी पुरणार नसल्याचे चित्र आहे. समाजातील विविध घटक शक्य तेवढे योगदान देत आहेत. डॉक्टरांनीही सामाजिक बांधिलकी ओळखून कोरोना लढ्यात मदत करावी, अशी मागणी होत आहे.