फुलेवाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाला गती द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ नोव्हेंबर २०२१ । पुणे । राष्ट्रीय स्मारक फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक जागेची भूमीसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन या कामास तात्काळ प्रारंभ करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिल्या. मुलींची पहिली शाळा असलेला भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करणे तसेच या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्यावतीने सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा उभारण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

पुणे येथील राष्ट्रीय स्मारक असलेल्या फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाबाबत आणि भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, प्रा. हरी नरके आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी फुलेवाडा आणि स्मारकाचे विस्तारीकरण लवकरच भूसंपादन करण्यात यावे अशा सूचना दिल्या. त्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात येईल असे आयुक्त आणि जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.

भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा : छगन भुजबळ

1848 साली भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून याठिकाणी मुलींची शाळा निर्माण करण्यात यावी. केवळ पुतळे न उभारता शाळा सुरू केल्यास खऱ्या अर्थाने ते स्मारक होईल. त्यानुसार येथे सावित्रीबाई फुले  मुलींची शाळा सुरू करण्यात यावी, अशी सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत केल्या.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी या इमारतीत असलेले वाणिज्यिक गाळेधारक तसेच रहिवासी यांच्या पुनर्वसनाबाबत संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढण्यात यावा असे सांगितले. यासंदर्भात न्यायप्रविष्ट प्रकरणात सहमतीने तोडगा काढता येईल. या वाड्यात शाळेच्या रुपाने एक चांगले स्मारक उभे राहील यासाठी सर्वांनीच पुढे आले पाहिजे असेही ते म्हणाले.

बैठकीस भिडेवाड्यातील गाळेधारक दुकानदार तसेच रहिवास्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!