सुपे येथील विविध कामांची केली पाहणी
स्थैर्य, बारामती दि.21 : ‘कोराना’च्या संकटाचा मुकाबला करतानाच तालुक्यात सुरु असणाऱ्या विविध विकास कामांची गती वाढविण्याबरोबरच कामे दर्जेदार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.
बारामती तालुक्यातील सुपे येथे सुरु असणाऱ्या विविध कामांची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी राहूल काळभोर, तालुका कृषी अधिकारी डी. बी. पडवळ, सुपे गावच्या सरपंच स्वाती हिरवे, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘कोराना’च्या संकटाशी लढताना शासनाने घालून दिलेल्या आरोग्य विषयक सर्व निकषांचे पालन करावे. त्याच बरोबर तालुक्यात सुरु असणारी विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. शासकीय इमारती शेजारी अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, काही अतिक्रमणे असल्यास ती तातडीने हटविण्यात यावीत. इमारतीच्या सभोवती झाडे लावावीत, मात्र ही झाडे देशी आणि ऊपयुक्त असावीत.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कऱ्हाटी (ता. बारामती) येथे कृषी विभागाच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या शेतकरी गटाच्या माध्यमांतून शेतकऱ्यांना बांधावर खत व बियाणे वाटपाच्या कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जळगाव सुपे-अंजनगाव शिव रस्त्याच्या कामाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पहिल्या टप्प्यातील दीड किलोमीटर रस्त्याचे काम सुरू असुन या योजनेअंतर्गत पुढील दीड किलोमीटर रस्त्याचे काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.