दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२२ । सातारा । सातारा येथे नगरपालिकेच्या आरोग्य महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी एका व्यक्तीसह पाच ते सहा महिलांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी संबंधितांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत यापुढे कोणी दादागिरी केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिला.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा येथील केसरकर पेठेत आज दुपारी नगरपालिकेच्या कायम आरोग्य महिला कर्मचारी सफाईचे काम करत असताना तेथीलच एक व्यक्ती एका महिला कर्मचाऱ्यांशी वाद घालू लागला. त्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांनी एकत्र येत संबंधित व्यक्तीला आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोला असे सांगत असताना त्या ठिकाणी परिसरातील आणखीन पाच ते सहा महिला दाखल झाल्या. त्यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पालिकेतील इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी संबंधित महिला कर्मचाऱ्यांचे मिळत शहर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. संबंधित व्यक्ती व महिलांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे मात्र संबंधितांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आरोग्य कर्मचारी म्हणाले, आरोग्य महिला कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या महिला या मागासवर्गीय समाजातील आहेत. त्यांना सातत्याने हीन प्रकारच्या वागणुकीला सामोरे जावे लागते. यापुढे कोणी दादागिरी केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल. दरम्यान झालेल्या घटनेचा वंचित बहुजन आघाडीने एक प्रसिद्ध पत्रक काढून निषेध व्यक्त केला आहे. आरोग्य महिला कर्मचारी सिंधू एकनाथ केसरे, मंदा रमेश भिसे, अश्विनी रोहित नवाळे यांच्यासह अन्य महिलांना अश्लील भाषा वापरून अपमानित केले जाते. हा प्रकार फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारा नाही. संबंधितांविरोधात सरकारी कामात अडथळा आणि मागासवर्गीय समाजातील महिलांना शिवीगाळ धक्काबुक्की केल्याच्या गुन्हा संबंधितांवर दाखल करण्यात यावा. अन्यथा सातारा नगरपालिकेचे सर्व सफाई कर्मचारी जन आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला आहे. प्रसिद्धी पत्रकावर वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गणेश भिसे यांची स्वाक्षरी आहे.