स्थैर्य, सातारा, दि.१४ : एका गावात ऊसतोड मजुराच्या पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील एकास शहर पोलिसांनी अटक केली आहे.
दिगंबर उध्दव सुपेकर (वय २०, रा. थाटेवाडी, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील एका गावात ऊसतोड मजूर राहत आहेत. याठिकाणी ट्रॅक्टरवर दिगंबर सुपेकर हा चालक म्हणून काम करत होता. संबंधित मुलीच्या घरातल्यांचा तो ओळखीचा होता. त्यामुळे तो काही वेळेला रात्री त्यांच्या घराशेजारीच झोपायचा. संबंधित मुलीच्या घराच्या बाजूलाच शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास त्याने मुलीवर अत्याचार केला. तसेच ही घटना कोणाला सांगू नये म्हणून तीला मारहाणही केली. हा प्रकार संबंधित अल्पवयीन मुलीने घरातल्यांना सांगितल्यानंतर घरातल्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन सुपेकरच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून दिगंबर सुपेकरला अटक केली. न्यायालयापुढे त्याला पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सी. एम. मछले हे करत आहेत.