स्थैर्य, सातारा, दि. 03 : काशीळ (ता.सातारा) येथील बंद घर फोडून चोरट्यानी पळविलेल्या मुद्देमालापैकी सुमारे २.७१ लाख रुपये किमतीचा रिकव्हर केलेला मुद्देमाल बोरगाव पोलिसांनी फिर्यादिस परत केला.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी १२ जुलै ते १७ जुलै दरम्यान काशीळ येथील गुलाममहम्मद मेहबूब भालदार हे कुटुंबियांसमवेत मुंबई येथे गेले असता अज्ञात चोरट्यानी त्यांचे बंद घर फोडून सोन्या दागिन्यासह सुमारे ६.७१ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. सेवानिवृत्त झाल्यानंतर उर्वरित आयुष्य व्यतीत करण्यासाठी त्यांनी साठवलेली ही रक्कम होती. तात्कालीन सपोनि चंद्रकांत माळी व पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांनी या जबरी चोरीचा तपास करत संशयितास अटक केली होती. तपासादरम्यान संशयिताने सुमारे ९ तोळ्यांचे सोन्याचे दागिने सोनारास विकल्याचे कबुल केले होते.
पोलिसांनी सोनाराकडून सोन्याची लगड जप्त केली होती. ही जप्त केलेली सोन्याची लगड मूळ फिर्यादी भालदार यांना परत करण्याचे आदेश नुकतेच प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी,सातारा यांनी दिले होते.या आदेशानुसार नुकतीच २.७१ लाख रुपये किमतीची ही सोन्याची लगड मूळ फिर्यादिस परत करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील व सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सपोनि चंद्रकांत माळी व पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांनी केली होती.