स्थैर्य, फलटण : पहिल्या छायाचित्रात हिराचंद कांतेलाल सराफ & सन्स शोरुम तर दुसऱ्या छायाचित्रात शोरुमच्या बाजूच्या भिंतीला आत जाण्यासाठी पाडण्यात आलेले होल |
स्थैर्य, फलटण : शहराच्या मध्यवर्ती भागात मुख्य बाजार पेठेतील हिराचंद कांतेलाल सराफ & सन्स ही सोन्या चांदीच्या दागिन्यांची नवीन शोरुम शनिवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास फोडून अज्ञात चोरट्यांनी ७८८ ग्रॅम वजनाचे सुमारे २५/३० लाख रुपयांहुन अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने लांबविले आहेत.
फलटण शहरात पी. एन. गाडगीळ, ज्योतीचंद भाईचंद सराफ, शांतीलाल खुशालचंद गांधी सराफ, धन्यकुमार रतनचंद गांधी, अशोक ज्वेलर्स, महावीर सराफ वगैरे जुन्या सराफी पेढ्यांसह नव्याने सुरु झालेल्या अनेक सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांनी पुण्यामुंबईप्रमाणे आकर्षक शोरुम उभारल्या आहेत, फलटण शहराप्रमाणे आता ग्रामीण भागातही लहान मोठी सराफी दुकाने सुरु झाली आहेत, मात्र मोजक्या २/४ दुकानांशिवाय कोणीही सुरक्षा रक्षक नियुक्त केल्याचे दिसत नाही. सर्वांची भिस्त प्रामुख्याने सी.सी. टी. व्ही., मजबुत लोखंडी शटर्स, उत्तम प्रकारची तिजोरी यावर असल्याचे दिसते. त्या सुविधा सर्व दुकानात आहेत.
हिराचंद कांतेलाल सराफ ही जुनी पेढी असून तिसऱ्या पिढीत त्यासमोर मेहता हाईट्स या प्रशस्त इमारतीमध्ये हिराचंद कांतेलाल सराफ & सन्स या नावाने नवीन शोरुम सुरु झाली आहे, शोरुमची उभारणी करताना स्वप्नील अनिल शहा सराफ यांनी अत्यंत मजबुत शटर्स, सी. सी. टी. व्ही. कॅमेरे, मजबुत व सुरक्षीत तिजोरी, अलार्म सिस्टीम वगैरे सर्व व्यवस्था केली आहे, परंतू चोरट्यांनी या सर्व व्यवस्थेला छेद देत भिंतीला छोटे होल पाडून त्यातून आत प्रवेश करुन दुकानाच्या डीस्प्ले मध्ये लावलेले सोन्याचे दागिने, अंगठ्या, चेन वगैरे सुमारे ७८८ ग्रॅम वजनाचे फक्त सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला आहे, तेथील चांदीचे किंवा १ ग्रॅम सोन्याचे दागिन्यांना चोरट्यांनी हात लावला नाही, तसेच तिजोरी अथवा शटरला स्पर्श झाल्यास अलार्म वाजणार असल्याची बहुदा माहिती असल्याने त्याने त्याबाबत विशेष खबरदारी घेतल्याचे दिसते.
भिंतीला होल पाडून आत प्रवेश करण्यापूर्वी तेथे असलेल्या सी.सी.टी.व्ही. मध्ये नोंद झाल्यास कोणी स्क्रिन वर पाहुन अडथळा येण्याचा धोका लक्षात घेऊन सदर सी.सी.टी.व्ही. फिरवून ठेवण्यात आला आहे, आतील सी.सी.टी.व्ही. मध्ये चित्रित झालेले तिघे चोरटे करोना पार्श्वभूमीवर उपलब्ध असलेले पीपीई किट परिधान करुन आल्याने त्यांची ओळख काहीशी कठीण होणार आहे, दरम्यान घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले होते, त्यांचा अहवाल तपासासाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.
दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रताप पोमण व त्यांचे सहकारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊळ, पोलीस उप निरीक्षक बनकर, व अन्य अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तपास सुरु झाला आहे.
सुमारे १० वर्षापूर्वी येथील अशोक ज्वेलर्स या सराफी दुकानात मोठा धाडसी दरोडा पडला होता त्यावेळी कोट्यावधी रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता, त्यानंतर हा मोठा चोरीचा प्रयत्न आहे. त्यावेळी सराफ बाजारात सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सराफ व्यापाऱ्यांसह सर्व व्यापाऱ्यांच्या बैठका घेऊन आग्रह धरला होता मात्र त्यावेळी कोणाला त्याचे गांभीर्य समजले नाही, आता पोलीस प्रशासनाने बाजार पेठेत सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याची आवश्यकता बोलून दाखविली आहे.