स्थैर्य, सातारा, दि. 09 : विषाणू प्रादुर्भावाने साऱया जगात कहर निर्माण केलाय. यामध्ये भारताची देखील कोरोना विरुध्द लढाई सुरु आहे. या कठीण काळात रक्त कमी पडत असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील रक्तदात्यांना रक्तदानाचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत साताऱ्यात अनेक संस्थांनी रक्तदान शिबिरे आयोजित केली होती. आता यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा या सामाजिक बांधिलकीतून साताऱ्यातील तब्बल 500 मुस्लिम बांधवानी रक्तदान करुन मानवता धर्म जपला.
सातारा जिल्हय़ात कोरोना विरुध्दची लढाई जोरदारपणे सुरु आहे. रुग्ण संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे 50 टक्के प्रमाण सध्या दिलासा आहे. यामध्ये रुग्णांना रक्ताची गरज असल्यास त्यांचा जीव वाचला पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत साताऱ्यातील मुस्लिम समाजाने हाजी जलालुद्दीन साहेब यांच्या स्मरणार्थ हे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत हे रक्तदान गेंडामाळ कब्रस्थान मस्जिदीत झाले.
साताऱ्यातील अक्षय ब्लड बँक व बालाजी ब्लॅड बँकांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रांगा लावून रक्तदान केले. यामध्ये मुस्लिम समाजाच्या 500 बांधवांनी रक्तदान करत साताऱ्यातील धार्मिक एकोप्याचे दर्शन घडवतानाच मानवतेचा आगळा वेगळा संदेश देत सामाजिक बांधिलकी जपली.
या शिबिराचे यशस्वी आयोजन करणारे सातारा तबलिग जमातचे अमीर अनिसभाई तांबोळी यांनी सांगितले की, केवळ दोन दिवसात मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही शिबिर आयोजित केले. त्याला मुस्लिम समाजाने चांगला प्रतिसाद दिला. राष्ट्रीय आपत्तीत आपण सर्वजण एक आहोत हीच या पाठीमागील भावना असून भविष्यात देखील गरज भासल्यास मुस्लिम समाजातर्फे आणखी मोठे रक्तदान शिबिर आयोजित केले जाईल.