दैनिक स्थैर्य | दि. २३ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
‘प्रत्येकामध्ये उंच भरारी मारण्याची क्षमता आहे. फक्त आपण त्याला आधार देणे आवश्यक आहे’ असे उद्गार फलटणचे तहसीलदार श्री. समीर यादव यांनी गुणवरे, ता. फलटण येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून काढले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, माजी जि. प. सदस्य विश्वासराव गावडे, गुणवरे गावच्या सरपंच सौ. अधिकाताई गावडे, गुणवरे गावचे उपसरपंच तथा पत्रकार श्री. रमेश आढाव, अकलूज प्रादेशिक परिवहन विभागाचे वाहन निरीक्षक संभाजीराव गावडे, ईश्वर कृपा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. ईश्वर गावडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास गुणवरे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ सर्व विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
अकलूज प्रादेशिक परिवहन विभागाचे वाहन निरीक्षक श्री. संभाजीराव गावडे यांनी पालकांना शाळेमध्ये असलेल्या सर्व भौतिक सुविधा व शाळेने आंतरराष्ट्रीय शिक्षण देणार्या लीड स्कूल सोबत केलेल्या भागिदारीबाबत व शाळेची शिक्षण पद्धती, मान्यता याबद्दल माहिती दिली.
गुणवरे गावचे उपसरपंच तथा पत्रकार श्री. रमेश आढाव यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी शाळेने राबवलेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
मुख्य अतिथी, ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंदभाई मेहता यांनी गुणवरे परिसरातील पालकांची विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी असलेली तळमळ पाहून गावडे कुटुंबीयांनी सुरू केलेल्या ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचे रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. शाळेस सर्व प्रकारच्या मान्यता असून या शाळेत घडणारे विद्यार्थी निश्चितच शाळेचे, गावाचे, तालुक्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास संपादन केला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने व दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे खजिनदार श्री. पोपटराव खोमणे यांच्या आकस्मिक निधनाबद्दल सर्वांनी त्यांना दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वहिली.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी गाण्यावर नृत्य सादर केले. यामध्ये महाराष्ट्राचे पारंपारिक लावणी, कोळीगीत, बांगडा बालगीते, अशा विविध प्रकारच्या गाण्यावर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले. इयत्ता सहावी ते नववीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेली, कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेली थीम ’घोडखिंडीची पावनखिंड कशी झाली’ याचा थरार पालकांना प्रत्यक्षात अनुभवला. गाण्यादरम्यान विद्यार्थ्यांनी इंग्लिश मधून केलेल्या सूत्रसंचालनाचे पालकांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, कलात्मकता पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य गिरिधर गावडे, शाळेतील नृत्य शिक्षक तेजस फाळके, प्रज्ञा आढाव, श्रद्धा जाधव सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ कोलवडकर यांनी केले, आभार रमेश सस्ते यांनी मानले.