दैनिक स्थैर्य । दि.१७ जानेवारी २०२२ । फलटण । जागतिकीकरणाच्या आजच्या युगात भाषा शिक्षणाचे महत्व दिवसें-दिवस वाढत असून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी काळाची पावले ओळखून भाषेच्या शिक्षणाकडे पाहिले पाहिजे. आज हिंदी भाषा ही केवळ साहित्य निर्मितीची भाषा राहिली नसून ती रोजगारीची भाषा बनली आहे, असे प्रतिपादन नागठाणे महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. शौकत आतार यांनी केले.
मुधोजी महाविद्यालय हिंदी विभाग व अग्रणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन विश्व हिंदी दिन (10 जानेवारी) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले प्रा. आतार पुढे असेही म्हणाले की, आज सर्वंच क्षेत्रात इंग्लिश भाषेच्या बरोबरीने हिंदी भाषेणे आपले स्थान निर्माण केले आहे. ‘प्रयोजनमूलक हिंदी’ हे हिंदी भाषेचे बदललेले नवीन रूप हिंदी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देत आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी वैश्विक स्तरावर हिंदीचे महत्व समजून घेऊन जर या भाषेवर प्रभुत्व मिळविले तर नक्कीच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे रोजगार मिळू शकतात. आज हिंदी भाषेचे देशातच नव्हे तर विदेशातील अनेक विद्यापीठांतून अध्ययन- अध्यापन केले जाते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांनी उपस्थित सर्वांना विश्व हिंदी दिनाच्या शुभेच्छा देऊन भाषा शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. नितीन धवडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. संजय जाधव यांनी करून दिला. या ऑनलाईन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संजय दीक्षित, अग्रणी महाविद्यालय योजना चे समन्वयक प्रा. सौ. रुक्मिणी भोसले व कला शाखेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. डॉ. सविता नाईक निंबाळकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्र-संचालन डॉ. जितेंद्र बनसोडे यांनी केले.