आरे कोरशेडचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातूनः फडणवीसांचा आरोप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.१२: आरे येथील मेट्रो कारशेड कांजुरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून घेतलेला आहे. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास चार हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले आहे. हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते? आणि कशासाठी?, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केला. 

कांजुरमार्गच्या जागेचा यापूर्वी सरकारने विचार केला होता. पण त्यावर उच्च न्यायालयाची स्थगिती होती. काही खासगी व्यक्तींनी त्या जागेवर दावा सांगितला. स्थगिती मागे घ्यावी, म्हणून विनंती करण्यात आली. न्यायालयाने दावे पुढील काळात निकाली निघाले, तर त्यासाठीची रक्कम भरण्यास सांगितले. ही रक्कम सन २०१५मध्ये सुमारे दोन हजार ४०० कोटी रुपयांच्या आसपास होती. आज त्या प्रकरणाची सद्यस्थिती काय? प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले तर विलंबाला जबाबदार कोण?, असे प्रश्न फडणवीस यांनी केले.

शिवाय कांजुरमार्गची जागा स्थिर करण्यासाठी किमान दोन वर्षांचा अवधी लागेल, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले आहे. याशिवाय आतापर्यंतच्या सर्व निविदा रद्द कराव्या लागतील आणि नव्याने संपूर्ण प्रक्रिया राबवावी लागेल. या नवीन जागेसाठी डीपीआर किंवा व्यवहार्यता अहवाल काहीही तयार झालेले नाही. जो मेट्रो प्रकल्प पुढच्या वर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला असता, तो आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे. आरेच्या कारशेडसाठी ४०० कोटी आधीच खर्च झालेले, स्थगितीमुळे १३०० कोटी पाण्यात गेले. शिवाय चार हजार कोटींचा वाढीव भार सोसावा लागेल. कांजुरमार्ग जागेचा वाद कायम राहिल्यास दोन हजार ४०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार आहे. आज त्यात आणखी किती वाढ होणार? एवढे सारे करून मेट्रो प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडणार आहे. आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खीळ बसेल, असे ते म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!