आपली फलटण मॅरेथॉन : स्पर्धेपेक्षा सहभागातून मिळणारा आनंद महत्त्वाचा – ना. जयकुमार गोरे


स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑक्टोबर : येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांच्या जोशी हॉस्पिटलमार्फत आयोजित ‘आपली फलटण मॅरेथॉन’च्या नवव्या पर्वाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या मॅरेथॉनमध्ये २२०० हून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवून आरोग्याप्रती असलेली जागरूकता दाखवून दिली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, राज्याच्या प्रथम महिला आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर, सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे म्हणाले की, “गेली नऊ वर्षे डॉ. जोशी आणि त्यांचे सहकारी अत्यंत उत्साहाने या मॅरेथॉनचे आयोजन करत आहेत. या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे. विशेषतः लहान मुलांपासून ते युवकांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि उत्साह दिसतो, तो अनमोल आहे. या स्पर्धेत कोण पहिला किंवा दुसरा येतो, हे महत्त्वाचे नाही, तर लोकांमध्ये एक सकारात्मक भावना आणि उत्साह निर्माण करण्याचे मोठे काम या मॅरेथॉनच्या माध्यमातून होत आहे.” डॉ. जोशी यांनी ज्या रुग्णांवर उपचार केले, तेच रुग्ण आज स्पर्धक म्हणून धावत आहेत, हे पाहून त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला व डॉ. जोशी यांच्या चिकाटीचे आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या वृत्तीचे कौतुक केले.

विधानपरिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी डॉ. जोशी यांच्या परिवाराशी असलेल्या जुन्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. त्यांनी प्रमुख पाहुण्या मीरा बोरवणकर यांच्या कार्याचा गौरव करत, ‘त्या माझ्या सर्वात आवडत्या आयपीएस अधिकारी आहेत,’ असे सांगितले. आपल्या भाषणात त्यांनी लोकशाहीतील मूल्यांविषयी चिंता व्यक्त केली. मॅरेथॉनच्या आयोजनावर बोलताना ते म्हणाले, “मॅरेथॉन केवळ रस्त्यावरून धावण्यापुरती मर्यादित न ठेवता, किल्ल्यावर किंवा डोंगररांगांमध्ये आयोजित करावी, जेणेकरून यातून ऑलिम्पिक स्तरावरील खेळाडू तयार होण्यास प्रेरणा मिळेल.”

राज्याच्या प्रथम महिला आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी फलटणमधील नागरिकांच्या उत्साहाचे कौतुक करत “फलटण बहुत सा बदला हुआ है,” असे गौरवोद्गार काढले. त्यांनी तरुणांना संदेश दिला की, “एका ठिकाणी अपयश आले तरी निराश न होता, नवीन मार्ग शोधले पाहिजेत.” पोलीस आणि नागरिकांमध्ये सलोख्याचे संबंध असणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी स्वतःच्या कारकिर्दीतील उदाहरणे देऊन स्पष्ट केले. त्याचवेळी, त्यांनी शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेवर बोट ठेवत, “फलटण पुरा बदलना चाहिये,” अशी अपेक्षा व्यक्त केली.

सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी फिट आणि हेल्दी फलटणसाठी दोन गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, “आपण काय खातो आणि काय बोलतो यावर नियंत्रण ठेवल्यास अनेक शारीरिक आणि मानसिक आजार दूर राहतील. योग्य आहार घ्या आणि जे खाल ते पचवण्यासाठी व्यायाम करा.” तसेच, मीरा बोरवणकर यांनी उपस्थित केलेल्या रस्त्यांच्या प्रश्नावर त्यांनी आश्वासन दिले की, “पुढच्या वेळी तुम्ही याल, तेव्हा तुम्हाला निश्चितच बदललेले फलटण पाहायला मिळेल.”

कार्यक्रमाचे आयोजक डॉ. प्रसाद जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकात मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “२०१५ पासून सुरू झालेल्या या मॅरेथॉनमध्ये यावर्षी २२०० धावपटूंनी सहभाग घेतला. यावर्षीची मॅरेथॉन अवयवदान आणि पर्यावरण संवर्धन या दोन महत्त्वपूर्ण संकल्पनांवर आधारित आहे. ‘एक झाड लावा आणि तीन वर्षे जगवा’ या उपक्रमात सहभागी होणाऱ्या धावपटूंना पुढील सर्व मॅरेथॉनमध्ये मोफत प्रवेश दिला जाईल.” डॉ. जोशी यांनी सर्व मान्यवरांचे आणि फलटणकरांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!