दैनिक स्थैर्य | दि. 28 डिसेंबर 2024 | फलटण | फलटण शहरात प्रतिवर्षीप्रमाणे जोशी हॉस्पिटल प्रा. लि. आणि रोबोटिक्स सेंटर, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली ‘आपली फलटण मॅरेथॉन’ यावर्षीही उत्साहाने सुरू होणार आहे. या वर्षी या मॅरेथॉनला सुमारे १३०० स्पर्धकांनी नाव नोंदणी केली असून, त्यामध्ये ६५ वर्षांवरील ३५० वृद्ध स्त्री-पुरुषांचा सहभाग लक्षणीय आहे.
गेली सात वर्षे प्रतिवर्षी आयोजित केली जात असलेली ही मॅरेथॉन लोकांना व्यायामाची सवय लावण्याच्या आणि सामूहिक आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. डॉ. प्रसाद जोशी यांनी सांगितले की, “प्रत्येक वर्षी लोकांचा उत्साह वाढतच असून, विविध वयोगटातील स्त्री-पुरुष, वृद्ध आणि तरुणांचा वाढता सहभाग समाधान देणारा आहे.”
या मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटातील स्पर्धकांसाठी वेगवेगळ्या अंतराच्या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. १८ ते ३० वयोगटातील स्पर्धकांसाठी १५ कि.मी., ३१ ते ४५ वयोगटातील स्पर्धकांसाठी १० कि.मी., ४६ ते ६४ वयोगटातील स्पर्धकांसाठी ५ कि.मी., आणि ६५ वर्षांवरील स्पर्धकांसाठी ३ कि.मी. अंतराची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. याशिवाय, रोबोटिक्स यंत्रणेद्वारे गुडघ्यांची शस्त्रक्रिया झालेल्या ३०० जणांसाठी एक कि.मी. अंतराची वाकेथॉन आयोजित करण्यात येणार आहे.
मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक फिनिशर मेडल आणि मॅरेथॉन किट दिले जाणार आहे, ज्यामध्ये टाइम चीप बिब, टी शर्ट, एनर्जी बार, टोपी आणि एक उत्तम भेट वस्तू असणार आहे. प्रत्येक विभागातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना अनुक्रमे १० हजार रुपये, ७ हजार रुपये आणि ५ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. या वर्षी अभिनेता, नाटककार, दिग्दर्शक, चित्रपट निर्माता आणि ‘बिग बॉस फेम’ महेश मांजरेकर यांना मार्गदर्शन आणि बक्षीस वितरणासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
स्पर्धेतील सहभागासाठी नाव नोंदणी केलेल्या सर्व स्पर्धकांनी दि. २, ३ व ४ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत जोशी हॉस्पिटल, फलटण येथून मॅरेथॉन किट घेऊन जावे असे आवाहन करण्यात आले आहे. रविवार, दि. ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ६ वाजता सजाई गार्डन कार्यालय, विमानतळ, फलटण येथून मॅरेथॉनचा शुभारंभ महेश मांजरेकर व अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.