
दैनिक स्थैर्य । दि. 04 ऑगस्ट 2025 । फलटण । शहरातून हद्दपार केलेला एक तरुण चक्क मिरवणुकीत सहभागी होऊन नाचत असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. फलटण शहर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. ही घटना शुक्रवार, दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास आंबेडकर चौक येथे घडली. मनोज उर्फ महेश गणपत इंगळे (वय २४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार रात्री लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी पोलीस पथक आंबेडकर चौकात तैनात होते. रात्री सुमारे ९:४५ वाजता पोलिसांना एक इसम अंधारात गाडीच्या आडोशाला संशयास्पदरीत्या लपून बसलेला दिसला. पोलीस त्याच्या दिशेने जात असल्याचे पाहून त्याने गर्दीत घुसून डोक्यावर बुरखा घेतला आणि ट्रॅक्टरच्या बोनेटवर चढून नाचू लागला.
पोलिसांनी जवळ जाऊन पाहिले असता तो तडीपार केलेला मनोज इंगळे असल्याचे ओळखले. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, इंगळे हा सराईत गुन्हेगार असून, दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने स्वतःची ओळख लपवून वावरत होता. त्याला सातारा जिल्हा हद्दीत प्रवेश करण्यासाठी परवानगी आहे का, असे विचारले असता त्याने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले.
आरोपी मनोज इंगळे याला पोलीस अधीक्षक, सातारा यांच्या दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजीच्या आदेशान्वये संपूर्ण सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुके आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. या आदेशाचे उल्लंघन करून परवानगीशिवाय हद्दपार क्षेत्रात प्रवेश केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र सुभाष टिके यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, फलटण शहर पोलीस ठाण्यात मनोज इंगळे विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ आणि १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार माधवी बोडके करीत आहेत.