
दैनिक स्थैर्य । 22 जुलै 2025 । सातारा। राजवाडा परिसरातील जुन्या जनावरांच्या दवाखान्याच्या जागेमध्ये राजवाडा परिसरातील पार्किंगचा प्रश्न सोडवणारा बहुमजली पार्किंग प्रकल्प तसेच अद्ययावत स्वरूपाची खाऊ गल्ली, बोट टेरेसवर कॅफेटेरिया असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पाला तब्बल 50 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असून लवकरच या वास्तूच्या उभारणीला प्रारंभ होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली
ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या संकल्पनेतून आणि केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या भांडवली खर्च निधीमधून हा प्रकल्प आकार घेत आहे. सातारा पालिकेने याबाबतची निविदा अंतिम केली असून लवकरच ठेकेदाराच्या माध्यमातून हे काम सुरू होणार आहे. सातारा शहरातील विशेषतः राजवाडा परिसरातील वाहतुकीची कोंडी व पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी जुन्या जनावरांच्या दवाखान्याच्या जागेत तीन मजली पार्किंग इमारत उभी राहणार आहे .पहिल्या मजल्यावर हॉकर्स साठी खाऊ गल्ली (75 स्टॉल्स), दुसर्या मजल्यावर 150 चार चाकी वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग तळ आणि टेरेसवर स्वतंत्र कॅफेटेरिया उभारला जाणार आहे, बेसमेंट मध्ये दीडशे दुचाकी मावतील इतकी प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे तसेच अडीचशे वाहनांचे दुमजली पार्किंग तळ उभे केले जाणार आहे.
राजवाड्यासमोरील चौपाटीचे या जागेमध्ये लवकरच स्थलांतरण होणार आहे त्यामुळे राजवाडा परिसर हा मोकळा राहणार असून तेथे स्वतंत्र लँडस्केप विकसित केले जाणार आहे. मुंबई येथील एन एम ए संस्थेकडूनया प्रकल्पाचा मानक नकाशा तयार करण्यात आला आहे. याची पाहणी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सकाळी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक मोने, माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, अमोल मोहिते, जयवंत भोसले, भालचंद्र निकम आदी मान्यवरांसह पालिकेचे अभियंता दिलीप चिद्रे, नगर अभियंता प्रतीक वैराट, तसेच ठेकेदार कंपनीचे सदस्य उपस्थित होते .
जुना दवाखाना परिसरातील वृक्षराजी वाचवणार
दरम्यान, जुना जनावरांचा दवाखाना हा जवळपास पावणे दोन एकरामध्ये पसरलेला आहे, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर जुनी झाडे आहेत. ही झाडे कशा पद्धतीने वाचवता येतील आणि त्यांना धक्का न लावता बहुमजली पार्किंग इमारत बांधा, झाडे वाचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, अशा स्पष्ट सूचना ठेकेदार कंपनीला ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या आहेत. येथील जनावरांचा जुना दवाखाना अन्यत्र हलवण्यात येणार असून नगरपालिकेकडून ही इमारत स्वतंत्ररित्या बांधून दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
श्रीमंत छ.ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले
सार्वजनिक बांधकाम मंत्री

