जनसामान्यांचे दूरदृष्टी असलेले नेते

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०७ फेब्रुवारी २०२२ । फलटण । दिवंगत मा.आ. चिमणरावजी कदम ऊर्फ सूर्याजीराव शंकरराव कदम.यांची आज जयंती त्यामिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन!!! रथसप्तमी म्हणजे फलटण तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार चिमणरावजी कदम यांचा जन्मदिवस. त्यांच्या आदर्श यशस्वी कार्यकर्तुत्वाला विनम्र अभिवादन!

मा.आ.चिमणरावजी कदम हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहे. सामान्य माणसांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या व्यथा वेदना जाणून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी झटणारा तत्त्वनिष्ठ,परखड विचाराचा नेता म्हणूनही ते ओळखले जातात. विधिमंडळात असताना अनेकदा प्रेक्षक गॅलरीतून प्रसारमाध्यमं चिमणरावांचे भाषण ऐकण्यासाठी उत्सुक असायची. अनेकदा त्यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्या त्या सत्राचा सर्वात उत्कृष्ट नेता म्हणूनही गौरवले आहे. फलटणच्या गजानन चौकात चिमणरावांची सभा म्हटलं की सर्व रस्ते गर्दीने तुडुंब भरायचे.ते शब्दांचे जादुगार होते. त्यांच्यानंतर असा परखड विचाराचा नेता फलटणला लाभला नाही. आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीच्या आठवणींना आज उजाळा देत आहे.

मा.आ. चिमणरावजी कदम हे गिरवीचे असल्याने माझ्या गावचे असल्यासारखेच वाटायचे.कारण गिरवी पासून माझे गाव जेमतेम चार पाच किलोमीटरवर आहे. मा.आ.चिमणरावजी कदमांची मुलाखत घेण्याचे माझ्या मनात होते. तो माझ्या अभ्यासाचा भाग होता. ते कडक आहेत.अत्यंत आक्रमक आहेत, परखड बोलतात, ते मुलाखत देणार नाहीत असे अनेकांनी मला सांगितले होते. पण मुलाखत घेण्याच्या इराद्याने मी त्यांची आगाऊ वेळ घेण्यासाठी मी माझे बंधू भानुदास घोरपडे व मा.आ. चिमणरावजी कदम यांचे निष्ठावंत कार्यकर्ते माझ्या गावचे भूषण पहेलवान दत्तात्रय दळवी यांच्यासमवेत त्यांच्या गिरवी येथील बंगल्यावर पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर त्यांनी ‘काय काम आहे’ असे विचारले. त्यावर मी येण्याचे प्रयोजन सांगितले. ठीक आहे म्हणून त्यांनी उद्या अकरा ची वेळ दिली. आम्ही तिथून बाहेर पडत होतो इतक्यात त्यांनी चहा घेऊन जाण्याची अधिकारवाणीने सूचना केली. पुढे ठरल्याप्रमाणे मी बंधू बी डी घोरपडे यांना सोबत घेऊन त्यांच्या घरी अकराच्या आधी पोहचलो. थोडा वेळ वाट पाहिली नंतर ते आले.आणि म्हणाले, ‘पाच मिनिटंच वेळ तुला देतो काय विचारायचे ते विचार’. त्यांनी बसण्याची सूचना केली.आणि मी भीतभीतच मुलाखत घेण्यास सुरूवात केली.त्यातून त्यांनी जी उत्तरे दिली त्यावरून त्यांची दूरदृष्टी दिसून येते.

शिक्षण पद्धती : हे पहा, शिक्षण पध्दती व शिक्षणाचा दर्जा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मातृभाषेतून शिक्षण द्यावं याबद्दल कुणाचं दुमत असण्याचे कारण नाही पण सरकारने मराठी माध्यमाच्या शाळा काढण्याची परवानगी न देण्याचे धोरण स्वीकारले आहे. आज जगाची भाषा ही इंग्रजी आहे पण आपल्या शिक्षणपद्धतीत इंग्रजीचे दर्जेदार शिक्षण मिळते का? शिक्षक अध्यापनासाठी दर्जेदार आहेत का? ते दर्जेदार मिळतात का? याचाही विचार करायला हवा. भाषा हे संवादाचे माध्यम आहे. संपूर्ण देशात अनेक भाषा बोलल्या जातात. त्याबद्दल त्या लोकांना अभिमान असावा का? असे विचारले तर मी असावा असे उत्तर देईन. पण संपूर्ण देशात संवाद करता येण्यासाठी आपण हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला व सर्वांनी आपल्या मातृभाषेचा आदर राखून जास्तीजास्त हिंदीचा वापर करावा. असेच धोरण आपण ठरवले पण दुर्दैवाने तमिळनाडू व इतर दक्षिणेतील काही राज्ये ही हिंदीचा बिलकूलच वापर करत नाहीत. हे मात्र समजण्यापलीकडचे आहे.गेल्या साठ वर्षांत आपण प्रयोगच करत आहोत.पण शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी खूपसा प्रयत्न झाला असे मला वाटत नाही. शिक्षक व्यसनाधीन आहेत. गुटखा, तंबाखू आणि दारू या व्यसनापासून तो मुक्त झाला पाहिजे. विद्यार्थ्यांसमोर शिक्षक हा आदर्श असतो. आजचे सक्तीचे शिक्षण हक्क विधेयक आले आहे त्यामुळे इयत्ता आठवीपर्यंतची मुले पासच करायची हे धोरण चुकीचे आहे. यामध्ये नवनवीन बाबींना वाव आहे. पण त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करण्याची संधी द्यायला हवी. मुलांना त्यांच्या आवडीने शिक्षण द्यायला पाहिजे. तरच उद्याची आदर्श पिढी तयार होण्यास मदत होईल.

फलटणमधील सामाजिक चळवळ : फलटणमध्ये अनेक चळवळी उदयाला आल्या आणि लोप ही पावल्या. काही ब्राह्मण मंडळी धार्मिक चळवळीत अग्रेसर होती. येथे हरिभाऊ निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट चळवळ उभी राहिली. पण पुढे हरिभाऊ कॉंग्रेसमध्ये गेले आणि चळवळ संपली.मधुकर भिसे यांनी कामगार चळवळ उभी केली. शेतकऱ्यांच्यासाठी लढा दिला. खंडवाढ शेतकऱ्यांचा लढा आपल्याला माहीत आहेच.पण तोही जास्त काळ टिकला नाही.दुसर्याप बाजूला राजे साहेबांची फलटण संस्थानातील चळवळ सुरु होती. अशा अनेक चळवळी फलटणमध्ये निपजला पण त्या जास्त काळ टिकल्या नाहीत. शैक्षणिक चळवळ मात्र आजही सुरू आहे. त्यावेळी निंबळक, तांबवे, पवारवाडी आदर्की अशा काही मोठ्या गावातच शाळा सुरू होत्या. पुढे तरडगाव, सासवड सारख्या गावात शाळा सुरू झाल्या. फलटण एज्युकेशन व श्रीराम एज्युकेशनच्या शाळा उभ्या राहिल्या. ग्रामीण भागातील जयभवानी एज्युकेशन सोसायटी या संस्थेने मात्र ग्रामीण भागातील मुलांचाच विचार करून त्यांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी ग्रामीण भागात हायस्कूल काढली.आज सव्वीस माध्यमिक विद्यालये आहेत. सातारा जिल्ह्यात संस्थेचा तिसरा क्रमांक लागतो. कृषी पदविका अभ्यासक्रमाचे कॉलेज, ज्युनिअर कॉलेज गिरवी येथे अध्यापक विद्यालय, फलटण येथे बी.एड कॉलेज व सध्या पॉलिटेक्निकल कॉलेज सुरू केले आहे. शिक्षणाचा विचार करता अनेक अभ्यासक्रमांची महाविद्यालये उभे राहायला पाहिजेत पण ती राहिली नाहीत. श्रीराम एज्युकेशनने महाविद्यालयासह फार्मसी कॉलेज सुरू केले आहे.प्रगती सुरू आहे पण सामाजिक विचार वृंद्धिगत होईल अशी चळवळ मात्र मला आज दिसत नाही. तरुण पिढी भरकटलेली आहे त्यांना सामाजिक विचार दिला गेला नाही.

आजच्या राजकीय परिस्थिती: सत्ता हे समाज परिवर्तनाचे साधन आहे असे म्हणतात हे आपल्याला माहीत आहेच पण आजचे राजकारण हे समाजासाठी नाही ते सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा यासाठी आहे मी तुम्हाला सांगतो, ‘एका जवळच्या गावात ग्रामपंचायत निवडणुकीत मला प्रचारासाठी बोलावलं होतं. मी म्हटलं ठीक आहे मी येतो. पण त्यांनी मला काय सांगावे? ते म्हणाले, ‘साहेब दारूवर काहीही बोलू नका’.कारण त्याचा मतदारांवर परिणाम होईल. आता बोला! यावर काय करायचे? ज्या गोष्टी आम्ही राजकारणात कधीच आणल्या नाहीत त्या गोष्टी आज राजरोसपणे सुरू आहेत. मटण, दारू आणि पैसा या गोष्टी राजकारणाचा कला बनल्या आहेत लोकही चार पैशासाठी आपलं इमान विकत आहेत. तेव्हा नैतिकते नैतिकता, विधायक कार्य या फक्त कागदावरचा गोष्टी उरल्या आहेत.राज्यकर्ते हे स्वार्थी, संधीसाधू व भ्रष्ट बनले आहेत. समाजाचं त्यांना काही देणं घेणं नाही. आमच्या काळात एवढं नव्हतं . सामान्य माणसाचं राजकारण आज उरलेला नाही.

लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा अनुभव : लोकप्रतिनिधी हा अभ्यासू असावा.असे मला वाटते. त्याच्या डोळ्यासमोर विकासाचा नकाशा असायला हवा.रचनात्मक कार्य करता येण्यासाठी या गोष्टींची गरज आहे. मी पूर्ण फलटण तालुक्याचा अभ्यास केला होता.इथले रस्ते, जलसिंचनासाठी जलसंधारणाची कामे, विविध अभ्यासक्रमांची महाविद्यालये, अत्याधुनिक हॉस्पिटल्स, औद्योगिक विकास महामंडळे सगळा प्लॅन/आराखडा तयार होता. पण हे प्रत्यक्षात आणण्यासाठी सत्ता दिली पाहिजे होती पण ती मिळाली नाही. ग्रामीण भागातील पाणी पुरवठय़ाचा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रादेशिक नळपाणी पुरवठ्याच्या सहा योजना अस्तित्वात आणल्या. यापैकी गिरवी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली. दुर्दैवाने सत्ताधाऱ्यांना तीही नीटपणे चालवता आली नाही किंवा चालवायची नाही.

२०२० पर्यंतचा रस्ते विकासाचा तालुक्याचा आराखडा तयार केला होता. यामुळे संपूर्ण तालुका हा इतर जिल्ह्यांना जोडून दळणवळणासह व्यापार उद्योग उभे करून रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या होत्या.यामध्ये फलटणचा दक्षिण भाग मला कोल्हापूर, सांगली, बेळगावला जोडून वाहतूक सुरु करायची होती.मोगराळे, ताथवडा सालपे हे घाट यांची सुधारणा करायची होती.आळजापूरपासून रेडे घाट, वेळोशी पासून कुळकजाई पर्यंत वाहतूक, गिरवी पासून वारुगड, मलवडी मार्गे निढळ हे मला जोडायचे होते.धुमाळवाडी पासून मोगराळे घाट व जावली पासून पाचवड घाट असा प्लॅन तयार होता. त्याला मंजुरीही मिळाली होती. पण सत्ताधाऱ्यांना तेही नको होते. त्यांना या कामाचे श्रेय मला जाईल ही भीती वाटत होती.म्हणून लोकप्रतिनिधींना व्हिजन असायला हवे. ते आज दिसत नाही. सभापती असताना कुटुंब नियोजनात संपूर्ण महाराष्ट्रात तालुका एक नंबरवर होता. ज्या कॉटेज हॉस्पिटलचे उद्घाटन मोरारजी देसाई यांनी केले होते ते हॉस्पिटल यशवंतराव चव्हाणांनी कराडला नेले. म्हणून मी उच्च स्तरावर प्रयत्न करून झिरपवाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने झिरपवाडी येथे ग्रामीण रुग्णालयासाठी जागा मिळवली.त्याठिकाणी कोट्यवधी रुपये खर्चून ग्रामीण रुग्णालय सुरू केले. पण हे फलटणपासून लांब आहे असे सांगून प्रस्थापित नेत्यांनी ते चालू दिले नाही. सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले पण ते ही अक्षरश: पाण्यात गेले.आज त्या सर्व इमारती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.दिवसाढवळ्या चोऱ्या सुरू आहेत. पण राज्यकर्त्यांना त्याचे काहीही देणेघेणे नाही. ही शोकांतिका आहे म्हणून लोकप्रतिनिधी अभ्यासू ,चिकित्सक व पुरोगामी विचारांचा असावा. सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा असावा. तालुक्यात असंख्य पाझर तलाव बांधले. रस्ते काढले. विकासाचे स्वप्न घेऊन काम केले.गरिबांना सत्तेत सहभागी करून घेतले.बयाजी जगताप या विडणीतील मागासवर्गीय कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे सभापती केले. शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवरही ते होते.

तुमचे छंद : लोकांशी बोलणे व चांगले पुस्तक वाचणे हे माझे छंद आहेत.

समाजकार्याची प्रेरणा : समाजकार्याची प्रेरणाही बालपणापासूनच मिळाली. विद्यार्थी दशेत खोलीवर असताना मुलांच्या जेवणाचे डबे एसटीमधून आणण्यास परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न केले. लोक समस्या घेऊन यायचे त्यांच्यासमवेत प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय येथे जायचो त्यांची कामे करायचो. बैल तगाई किंवा इतर त्यांच्या समस्यांमध्ये सतत त्यांना मदत केली. यातून समाजासाठी काहीतरी करावे असे वाटू लागले यातूनच समाजकार्याची आवड लागली. आणि प्रत्येकावरच समाजाचं ऋण असते ते आपण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

जीवनातील अविस्मरणीय क्षण : विधिमंडळातील काम हा अविस्मरणीय क्षण. यात विधिमंडळातील बेस्ट नेता म्हणून सन्मान झाला. पण बेस्ट पार्लमेंटेरियन होण्याची इच्छा मात्र अपूर्ण राहिली.आज संसदेत काहीही न मांडणारे संसद सदस्य आहेत. त्याठिकाणी अभ्यासू व कर्तबगार माणसं जायला पाहिजेत.

तुमचे आवडते पुस्तक : पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ‘ग्रिनसेस ऑफ हिस्ट्री’ व कार्ल मार्क्स यांचे ‘दास कॅपिटल’ ही दोन पुस्तके मला खूप आवडतात.त्यातल्या त्यात ‘धर्म ही अफूची गोळी आहे’ हे मार्क्सचं वाक्य मला खूप आवडते.

पुनर्जन्म : मी पुनर्जन्म या संकल्पना मानत नाही. पण जर तो असेलच तर ‘माझा जन्म हा पुन्हा शेतकरी कष्टकऱ्यांच्या कुटूंबात व्हावा ही माझी इच्छा आहे. एक कर्तबगार माणूस ते विधिमंडळाचा झुंजार नेता म्हणून

कुटुंबियांचे योगदान : प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या जडणघडणीमध्ये आपल्या कुटुंबीयांचे योगदान असतं. ते आपल्याला नाकारून चालत नाही. माझ्या संपूर्ण जडणघडणीमध्ये आमच्या बाईसाहेबांचे योगदान अनन्यसाधारण आहे.पण त्याच्याही पुढे जाऊन माझ्या संपूर्ण जडणघडणीमध्ये या तालुक्यातील सामान्यातला सामान्य माणूस, शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित व उपेक्षित माणूस यांचे योगदान आहे. तोच माझ्या समाजकार्य व राजकारणाचा केंद्रबिंदू आहे.त्याचप्रमाणे माझ्यावर नितांत श्रद्धा असणारे माझे सर्व कार्यकर्ते, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रातील माझे मित्र हितसंबंधी, मित्रही व शत्रूही.

शरद पवारांचे राजकीय विरोधक : हे बघा शरद पवार व माझ्यात वैयक्तिक कोणत्याही प्रकारचं वैयक्तिक वैर भाव नाहीत.ते माझे मित्रच आहेत.त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये तात्त्विक स्वरुपाचे वैचारिक मतभेद आहेत.त्यामुळे त्यांची भूमिका वेगळी माझी भूमिका वेगळी.त्यामुळे आमच्या दोघांमध्ये शाब्दिक हल्ले होत राहतात इतकेच.माझ्यासारखा स्पष्टवक्ता व परखड विचारांचा माणूस व्यवस्थेला व त्यांना चालत नाही.म्हणून साम,दाम, दंड भेद वापरून ते मला पाडण्यासाठी प्रयत्न करतात.पण मी सर्वांना पुरुन उरणार आहे कारण माझा लढा इथल्या सामान्य माणसासाठीच आहे.

विरोधकांसाठी सल्ला : प्रत्येक राजकारणी माणसाच्या हातून काही चांगल्या काही वाईट गोष्टी घडत असतात.प्रत्येकाने आपल्या विकासाचा केंद्रबिंदू इथला सामान्य माणूस ठेवावा. तालुक्यातील कोणतीही मोठी कामे ही कोण्या एकाचे श्रेय नसतं.यामध्ये सर्वांचे योगदान असते ते आपल्याला विसरून चालत नाही आणि चालणारही नाही.त्यामुळे विरोधकांना एवढंच सांगेन त्यांनी त्यांचं राजकारण करावं. आम्ही आमचं राजकारण करु.

तरुणांसाठी संदेश : तरुणांना व्यसनापासून अलिप्त राहावे. कष्ट करण्याची सवय ठेवावी. वाचनाचा छंद जोपासला पाहिजे.चुकीच्या दिशेने जाऊ नये.कारण आज मीडियाचा अतिरेक वाढला आहे. मालिकांमुळे स्त्रियांचे कुटूंबाकडे असणारे लक्ष कमी झाले आहे. त्या मालिकेतच स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा परिणाम तरुण पिढीवर होत आहे.विद्यार्थ्यांचे प्रबोधन करायचा असेल तर त्यांना थोर नेत्यांची चरित्र वाचायला द्यायला पाहिजेत. अभ्यासक्रमातही बदल करायला हवा. तरूणांमध्ये सामाजिक विचार रुजवले पाहिजेत मी दोनच जाती मानतो एक म्हणजे गरीब व दुसरी श्रीमंत.जातीची उतरंड मला अजिबात मान्य नाही. माझ्यावर डाव्या विचारांचा प्रभाव आहे.तरूणांनी जातीपेक्षा समताधिष्ठित समाजरचनेचा आग्रह धरावा त्यातच त्यांचे भले आहे.

माननीय चिमणरावजी कदम खर्डे वक्ते, झुंजार नेते, अभ्यासू नेतृत्व म्हणून उभ्या महाराष्ट्राला ते परिचित आहेत. अखंड संघर्ष हे त्यांच्या जीवनाचे सूत्र आहे. फलटणचा इतिहास पाहताना पुढच्या पिढीला चिमणरावांचे कार्य विसरून चालणार नाही. त्यांनी मुत्सद्दी राजकारण केले.समाजकारणही केले. पण सामान्य माणसाशी असलेले नाते त्यांनी तोडले नाही.आजही लोक त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करतात. त्यांना मानणाऱ्या लोकांची संख्या आजही घटलेली नाही. सत्ता संघर्षात फलटण तालुक्यात बरीच उलथापालथ झाली पण मा.चिमणराव जी कदमांचे नाव घेतल्याशिवाय फलटणचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. मुळात एका शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी आपला काफिला पुढे नेला.सोबत येणार्यां ना सोबत घेऊन तालुक्याच्या विकासाचे स्वप्न नव्हे तर संकल्प घेऊन ते अखंडपणे लढत राहिले. ते जरी आज आपल्यात नाहीत तरी त्यांचा संघर्ष संपला नाही.त्यांनी आयुष्यात कधीही हुजरेगिरी किंवा लांगूलचालन केले नाही.ते जर केले असते तर ते संसदेत गेले असते. किंवा एखाद्या राज्याचे राज्यपाल झाले असते.पण आयुष्यात आपला ताठ बाणा त्यांनी कधी सोडला नाही अशा झुंझार नेत्याचे नाव पुढच्या पिढय़ा आदरानेच घेतील.

सूर्याजीराव उर्फ चिमणराव शंकरराव कदम हे शंकरराव व पार्वतीबाई यांच्या पोटी रथसप्तमी दिवशी जन्माला आल्याने त्यांचं नाव सूर्याजीराव असे ठेवण्यात आले.पण ते चिमणरावजी कदम या नावाने प्रसिद्ध झाले. वाचनाची प्रचंड आवड असणाऱ्या चिमणराव कदमांनी पदवी पर्यंतचे शिक्षण घेवून कायदयाचे ही यशस्वीरीत्या पूर्ण केले. समृद्ध वाचन,भेदक नजर आणि करारी मुद्रा यातून त्यांच्यात कमालीचं भाषण संभाषण कौशल्य विकसित होत गेले होते. शेती, पाणी,शिक्षण,रोजगार,वृक्षारोपण इत्यादी विषयावर ते तासनतास बोलायचे. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या चिमणरावजी कदम साहेबांनी फलटण तालुक्याचे सलग १५ वर्षे एक यशस्वी लोकप्रिय आमदार म्हणून काम केले. महाराष्ट्र विधानसभेत मुलूख मैदानी तोफ अशी त्यांची विशेष ओळख होती. त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.आमदार होण्यापूर्वी ते फलटण तालुका पंचायत समिती सभापती व सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते.सातारा जिल्हा बँक, मालोजी राजे बँक, राज्य परिवहन महामंडळ, शिवाजी विद्यापीठ संचालक पद ही विविध पदे आपल्या कार्यकर्तुत्वाने समर्थपणे गाजवली.

महाराष्ट्र शासन रोजगार हमी योजना कॅबिनेट मंत्री असताना त्यांनी संपुर्ण महाराष्ट्रभर पाणलोट क्षेत्र विकासाचे प्रचंड काम केले. जलसंधारण व मृदसंधारण कामे अत्यंत उत्कृष्ट दर्जाची त्यांनी केली.नाला बंडिंग,पाझर तलाव व फलटण तालुक्यातील रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण इत्यादी कामांची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली.फलटण तालुक्यात धोम बलकवडी चे पाणी आणण्यासाठी व गुंजवनी धरण उभारणीसाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा.मुलींना शिकता यावे यासाठी १९७१ साली गिरवी येथे जय भवानी एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केली. आज या संस्थेची फलटण तालुक्यात अनेक हायस्कूल,ज्युनिअर कॉलेज,तंत्र विद्यालय,डी एड, बीएड कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज असून त्यातून हजारो विद्यार्थी व मुली शिक्षण घेत आहेत. असे हे बहूआयमी व्यक्तिमत्त्व म्हणजेच चिमणरावजी कदम साहेब यांचा मृत्यू १३ डिसेंबर २०१४ रोजी झाला. समाज उन्नतीच ध्येय ठेवून शेती, शिक्षण, जलसंधारण, औद्योगिकीकरण, समाजपरिवर्तन या तत्त्वांवर कार्य करीत इथल्या जनसामान्यांसाठी व शेतकर्यांतच्या न्याय्य हक्कांसाठी अहोरात्र झिजलेल्या असामान्य लोकनेतृत्वास, द्रष्टया लोकनेत्यास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!!

सोमिनाथ पोपट घोरपडे, प्रकल्प अधिकारी
प्रगत शिक्षण संस्था,फलटण
मो.नं.७३८७१४५४०७
इमेल : [email protected]


Back to top button
Don`t copy text!