आदिवासी विज्ञान काँग्रेसमध्ये जननायकांच्या कर्तृत्वाचे दर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ जानेवारी २०२३ । मुंबई । राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू असलेली 108 वी भारतीय विज्ञान काँग्रेस वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. आदिवासी समाजाला या विज्ञानाच्या महाकुंभात प्रथमच मिळालेले स्थान हेच ते वैशिष्टय. या समाजाने निसर्ग व जैवविविधता संवर्धन, वनौषधींचा शोध, जपलेले सांस्कृतिक वैभव म्हणजे देशाचा अमूल्य ठेवा आहे. या समाजाने विकसित केलेले तंत्र त्याचा विज्ञानात उपयोग व्हावा या दृष्टीने भारतीय विज्ञान काँग्रेसने आदिवासी विज्ञान काँग्रेसचा समावेश केला आहे. नागपूर विद्यापीठाच्या विस्तीर्ण परिसरात शहीद बिरसा मुंडा सभागृहाच्या प्रवेश द्वारावरच आदिवासी जननायक हे अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

आदिवासी समाजाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत दिलेले योगदान अमूल्य आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्या त्या भागातील आदिवासींचे नेतृत्व करणारे नायक येथे ठळकपणे दर्शविण्यात आले आहेत. देशभरातील एकूण 50 आदिवासी जननायकांची माहिती या ठिकाणी सचित्र प्रदर्शित करण्यात आली आहे. यात आदिवासी समाजातील लढवय्या पाच महिलांचाही समावेश आहे.

महाराष्ट्रातील आदिवासी जननायक

ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यात महाराष्ट्राचा कोकण भाग अग्रणी होता. रायगड जिल्ह्यातील चिरनेर येथे झालेला लढ्यात आदिवासींचे नेतृत्व करणारा उग्य महादया कातकरी हा जननायक या प्रदर्शनात ठळकपणे दिसून येतो. उरण तालुक्यातील चिरनेर जंगलात ब्रिटिशांना निकराचा लढा देणारे उग्य महादया यांचे बलिदान दिसून येते.

अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव येथील राघोजी भांगरे यांचे शौर्य ही या ठिकाणी प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये ब्रिटिशांना नामोहरम करण्यात मोलाची भूमिका बजावणारे राघोजी. यासह ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या राघोजींची कारकीर्द आणि शेवटी पंढरपूर येथे त्यांना झालेली  अटक असा इतिहास येथे मांडण्यात आला आहे.

नाशिक येथील नंदुर शिंगोटे यांचे योगदानही या प्रदर्शनात ठळकपणे दिसून येते. नाशिक-पुणे मार्गावर ब्रिटिशांना रोखून धरत झालेली भीषण लढाई आणि पुढे त्या घाटास देण्यात आलेले ‘भागोजी घाट’ हे नाव त्यांच्या कार्याची चुणूक दर्शविते.

या प्रदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यातील घोटगाव येथील बाबुराव शेडमाके यांच्या कार्याचा गौरव ही दिसून येतो.त्यांनी आदिवासी तरुणांना इंग्रजांविरुध्द एकजूट करून रोमहर्षक लढा दिला आहे.

आदिवासी राजे राणींचेही कटआऊट

आदिवासी विज्ञान काँग्रेसच्या मुख्यमंचाच्या शेजारी त असलेले आदिवासी राजवटीतील महापुरुषांचे कट आउटही लक्ष वेधून घेतात. येथे राणी दुर्गावती राजमाता राणी हिराई आत्राम आणि नागपूरचे निर्माते भक्त बुलंदशहा यांचे कट आऊट त्यांच्या कार्याचा गौरव दर्शवितात.

-रितेश मो.भुयार

माहिती अधिकारी


Back to top button
Don`t copy text!