मुख्यमंत्र्यांची युगांडाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०९ सप्टेंबर २०२२ । मुंबई । युगांडा मध्ये होणाऱ्या ॲफ्रो-इंडियन इन्ह्वेस्टमेंट समिट-२०२२ चे युगांडाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण दिले. यासाठी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

या शिष्टमंडळात युगांडाचे परराष्ट्र राज्यमंत्री हेन्री ओरेम ओकेलो, भारतातील उच्चायुक्त मार्गारेट क्योजिरे, मुंबईतील वाणिज्य दूत मधुसूदन अग्रवाल, युगांडातील इंडियन असोसिएशचे अध्यक्ष मोहन राव, महासचिव वाहिद मोहम्मद, कंपालातील इंडियन बिझनेस फोरमचे सचिव मोहन रेड्डी आदींचा समावेश होता.

या भेटीत उभय देशांतील विविध क्षेत्रातील विकास प्रकल्प प्रगतीबाबत चर्चा झाली. या चर्चेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी युगांडामधील एकंदरीत विकसनशील वाटचालीबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी परराष्ट्र राज्यमंत्री हेन्री ओरेम ओकेलो यांनी युगांडाच्या इतिहास आणि प्रगतीबाबत माहिती देताना युंगाडामध्ये गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध आहेत. अनेक भारतीय उद्योजकांनी या देशात मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करून युगांडाच्या आर्थिक उन्नतीत सहभाग नोंदवला आहे. याच पार्श्वभूमीवर गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून यशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. आगामी गुंतवणूकदारांसाठी एक खिडकी योजनाही राबविली जाईल.भारत आणि युगांडा देशांचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी या परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण श्री. ओकेलो यांनी मुख्यमंत्री श्री शिंदे यांना दिले.

महाराष्ट्र शासनाने प्रामुख्याने कृषि, पर्यटन, खनिकर्म आणि शिक्षण क्षेत्रावर भर दिला आहे. त्यादृष्टीने राज्य शासन काम करीत आहे. या क्षेत्रांच्या विकासासाठी दोन्ही राष्ट्रांमध्ये परस्पर पुरक सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही राष्ट्रांत गुंतवणूक वाढीसाठी महाराष्ट्र शासन संपूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी युगांडाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानातील श्री गणेशाचे दर्शनही घेतले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शिष्टमंडळाचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.


Back to top button
Don`t copy text!