उपोसथ व्रत म्हणजेच अष्टशीलाचे पालन करणाराच खरा उपासक, उपसिका – भन्ते विमलबोधी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२३ । मुंबई ।“भगवान बुद्ध म्हणतात की मी उपदेशिलेल्या धम्मानुसार उपोसथ व्रताचे पालन म्हणजेच अष्टशीलाचे पालन जे करतात तेच खरे उपासक उपासिका होत, बौद्ध उपासक, उपसिकांनी पंचशील म्हणजेच १) प्राणी हिंसा २) न दिलेली वस्तू घेणे ३) ब्रम्हचर्य भंग ४) खोटे बोलणे ५)  दारू, मद्य, मादक पदार्थ सेवन पासून विरत राहणे या पाच शीलांचे व त्याव्यतिरिक्त उपोसथ व्रत धारण करणाऱ्यांनी ६) विकाली म्हणजे मध्यानानंतर भोजन ७) नाच, गाणे, वाद्य, अश्लिल दृश्य, हार, सुगंधी द्रव्य व अलंकार ८) उच्च प्रतीचे व विलासयुक्त आसन यांपासून विरत राहून अष्टशील पालन करणे आवश्यक आहे यालाच आर्य अष्टांग उपोसथ किंवा आर्य-उपोसथ म्हणतात. गृहस्थांना रोजच्या जीवनात पंचशीलाचे पालन करता येईल पण अष्टशीलाचे पालन करण्याचे व्रत महिन्यातील चार दिवस म्हणजे शुक्ल पक्षातील अष्टमी, पौर्णिमा, कृष्णपक्षातील अष्टमी, चतुर्दशी हे चार दिवस अष्टशील धारण करून उपोसथ व्रत करावे, अश्या रीतीने जे गृहस्थ व गृहिणी अष्टशील धारण करून उपोसथ व्रताचे पालन करून धम्माचे अनुसरून करतात तेच खरे उपासक आणि उपसिका होत” असे प्रतिपादन भन्ते विमलबोधी यांनी आर्य अष्टांग मार्ग म्हणजे सुखी जीवन जगण्याची कला या विषयावर धम्मदेसना देताना जेतवन बुद्धीविहार मुंढर येथे केले.

बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने सालाबादप्रमाणे विभागवार वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याच पुष्पमाळेतील एक पुष्प बौद्धजन सहकारी संघ गिमवी विभाग क्र. ३ तसेच बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र. २४ मौजे मुंढर, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी मुंबई-गाव शाखा, महिला मंडळ व विद्यार्थी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विभाग अध्यक्ष राजेश रामचंद्र मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली जेतवन बुद्ध विहार मौजे मुंढर येथे धम्मदेसनेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग सचिव निलेश गमरे व स्थानिक शाखा सचिव राजेश नारायण मोहिते यांनी केले तर प्रस्ताविक मनोज गमरे यांनी सादर केले तसेच स्वागताध्यक्ष दर्शन तुकाराम गमरे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. सदर प्रसंगी प्रमुख विश्वस्त संजयजी पवार, विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास गमरे, गाव शाखा तालूका अध्यक्ष सुनील जाधव, संस्कार समिती अध्यक्ष शशिकांत जाधव व ग्रुप, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकवृंद व कर्मचारी, ग्रामस्थ, विभागातील संलग्न शाखा त्यांचे पदाधिकारी, मुंढर गाव व मुंबई शाखेचे आजी-माजी पदाधिकारी, सभासद आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात धार्मिक पूजापाठ भन्ते विमलबोधी यांच्या सुश्राव्य आवाजात पार पडला, तसेच दुसऱ्या सत्रात जिल्हा परिषद शाळा क्र. १ मधून स्वरा संतोष लांजेकर (तेली समाजातील सुकन्या) हिने कोणत्याही सुखसुविधा नसताना, मार्गदर्शन व आधार नसताना ही अथक परिश्रम करून प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवून जिल्ह्यात ११८, गुहागर तालुक्यात ८ वा तर गावात १ हिला क्रमांक पटकावून गावचे नाव उंचावल्याने बौद्धजन सहकारी संघ, गिमवी विभाग क्र. ३ आणि बौद्धजन सहकारी संघ, शाखा क्र. २४ मौजे मुंढर यांच्या संयुक्त वतीने तिला शाल पुष्प, प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. भविष्यात शैक्षणिक कामात कोणती अडचण भासली तर आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन दिले व सदर प्रसंगी तिचे आईवडील व शिक्षकांचा ही सत्कार करण्यात आला.

सदर प्रसंगी प्रमुख विश्वस्त संजयजी पवार बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने निर्माण होत असणाऱ्या पतसंस्थेबद्दल मार्गदर्शन केले, त्यामुळे नजीकच्या काळात स्थानिक युवकांना उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधी, स्थानिक ग्रामस्थांना होणारे फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली व सदर पतसंस्थेचे सभासद होण्याचे आव्हाहन केले.

सदर कार्यक्रम समाजातील सर्वच स्तरांतील लोकांच्या उस्फुर्त प्रतिसाद व उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला, सदर प्रसंगी अनेक मान्यवरांनी सढळ हस्ते धम्मदान केले त्यासर्वांचे व सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून विभाग सचिव निलेश गमरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.


Back to top button
Don`t copy text!