पिढ्यानपिढ्यांची परंपरा! निंभोरे येथे रणवरे परिवाराच्या वंशावळ वाचनास सुरुवात

राजस्थान येथील भाट परिवाराकडून ५० वर्षांनंतर पूर्वजांच्या माहितीचे जतन व अद्ययावतीकरण


स्थैर्य, फलटण, दि. ०७ ऑगस्ट : फलटण तालुक्यातील निंभोरे येथील रणवरे-रणवरे परिवाराच्या वंशावळ वाचन आणि माहिती अद्ययावत करण्याच्या कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. राजस्थान येथील वंशावळ लेखक विनोद कुमार भाट यांच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्यांची ही परंपरा जपली जात आहे.

विनोद कुमार भाट यांच्या पूर्वजांनी यापूर्वी १९३५ आणि १९७२ साली निंभोरे येथे येऊन रणवरे परिवाराची माहिती त्यांच्या पोथीमध्ये जतन केली होती. तब्बल ५० वर्षांनंतर, तीच माहिती नव्या पिढीला समजावी आणि त्यापुढील माहिती समाविष्ट करून जतन करण्यासाठी विनोद कुमार भाट हे निंभोरे येथे दाखल झाले आहेत.

गावातील श्री गणेश मंदिरात रणवरे परिवाराच्या वतीने विनोद कुमार भाट आणि त्यांच्या पत्नीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर, परिवारातील महिलांच्या हस्ते पोथीचे पूजन करून वंशावळ वाचनास प्रारंभ झाला. यापुढे प्रत्येक वाडीनुसार एकत्र बैठक घेऊन पूर्वजांची माहिती सांगितली जाणार आहे आणि नवीन माहिती समाविष्ट केली जाणार आहे.

यावेळी रणवरे परिवाराच्या वतीने विनोद कुमार भाट यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास अशोकराव रणवरे, शंकराव रणवरे, सिताराम रणवरे, मुकुंदनाना रणवरे, हभप निलेश महाराज, विक्रमसिंह मोहिते, सचिन रणवरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत शिवव्याख्याते प्रमोद रणवरे यांनी, तर आभार अमित रणवरे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!