दैनिक स्थैर्य | दि. ९ जून २०२४ | नवी दिल्ली |
नरेंद्र मोदी ३.० सरकारमध्ये महाराष्ट्रातील एकूण ६ जणांना मंत्रीपद मिळाले आहे. यामध्ये भाजपच्या ४ आणि शिंदे सेनेच्या एका मंत्र्याचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात नागपूरचे नितीन गडकरी, मुंबईचे पीयूष गोयल, मुंबईचे रामदास आठवले, उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे, पश्चिम महाराष्ट्रातून मुरलीधर मोहोळ आणि विदर्भातील बुलढाणामधून शिंदे सेनेचे प्रतापराव जाधव यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बसलेल्या धक्क्यानंतर मंत्रिमंडळात समावेश करताना प्रादेशिक आणि जातीय समतोल दिसून आला आहे. गडकरींच्या रूपाने ओबीसी, मराठा, एससी आणि ब्राह्मण चेहर्यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. मात्र, मराठवाडा आणि कोकणातून कोणालाही मंत्रिपद मिळाले नसल्याने राजकीय पंडितही आश्चर्य व्यक्त करत आहेत. मोदींच्या दुसर्या टर्ममध्ये रावसाहेब दानवे मराठवाड्यातून आणि नारायण राणे कोकणातून मंत्री होते. मात्र, मंत्रिमंडळात समावेश करण्यापूर्वी आगामी विधानसभा निवडणुकीतील नफा-तोट्याचे विश्लेषण करून त्याच आधारे मंत्र्यांसाठी चेहर्यांची निवड करण्यात आल्याचे लोकांचे मत आहे.