
दैनिक स्थैर्य | दि. 03 एप्रिल 2023 | फलटण | नुकत्याच जाहीर झालेल्या फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांसाठी आज शेवटच्या दिवशी एकूण 121 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर दि. 05 रोजी दाखल झालेल्या नामनिर्देशित अर्जांची छाननी करण्यात येणार आहे व दि. 6 ते 20 पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असणार आहे, अशी असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांनी दिली. बाजार समितीच्या सत्ताधारी राजे गटामध्ये अनेकांची रस्सीखेच सुरू आहे. आगामी काळामध्ये नक्की कुणावर अंतिम मोहोर असणार आहे; याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झालेल्या होत्या. आज दि. 3 रोजी बाजार समितीसाठी नामनिर्देशित अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज सकाळी 11:00 वाजल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटासह व शिवसेनेच्या विविध उमेदवारांनी आज बाजार समितीसाठी आपले नामनिर्देशित अर्ज विहित नमुन्यात दाखल केले.
सोसायटी मतदार संघ यामध्ये ११ संचालक निवडून द्यावयाचे त्यापैकी सर्वसाधारण ७ जागांसाठी 52 अर्ज, महिला २ जागांसाठी 9 अर्ज, इतर मागास प्रवर्ग १ जागेसाठी 6, अर्ज भटक्या विमुक्त जाती जमाती १ जागेसाठी 14 अर्ज दाखल झाले आहेत.
ग्रामपंचायत मतदार संघामध्ये ४ संचालक निवडून द्यावयाचे त्यापैकी सर्वसाधारण २ जागेसाठी 26 अर्ज, अनुसूचित जाती जमाती १ जागेसाठी 2 अर्ज, आर्थिक दुर्बल १ जागेसाठी 7 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
व्यापारी अडते मतदार संघ २ जागेसाठी 4 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. हमाल मापाडी मतदार संघ १ जागेसाठी 1 अर्ज दाखल करण्यात आला आहे; असे एकूण १८ संचालक बाजार समितीसाठी निवडून द्यायचे आहेत.
आज अखेर दाखल झालेल्या अर्जांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाच्यावतीने बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, बाजार समितीचे माजी उपसभापती भगवानराव होळकर तर शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख नानासाहेब उर्फ पिंटू इवरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख प्रदीप झणझणे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.
आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वांनीच आपले अर्ज दाखल केलेले आहेत. परंतु दि. 20 रोजी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी बाजार समिती निवडणुकीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.