
स्थैर्य, सातारा/पुणे, दि. 30 डिसेंबर : सातारा येथे होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वैविध्यपूर्ण साहित्यिक उपक्रम अनुभवतानाच महाराष्ट्रीय पौष्टिक खाद्यपदार्थांची मेजवानी मिळणार आहे. सातारा, कोरेगाव, मावळ, जावळीचे खोरे येथील वैशिष्ट्य असलेल्या विविध पदार्थांचा समावेश भोजनात आवर्जून करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीत प्रामुख्याने असणारे आमटी, भात, पोळी, भाकरी, भाजी, मसालेभात यांच्यासह ताटात डाव्याबाजूला प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कोशिंबिरी असणार आहेत.
संमेलनकाळात उपलब्ध असणार्या नाष्टा आणि भोजनामध्ये इतर प्रांतिय पदार्थ टाळण्यात आले असून महाराष्ट्रासह सातारची ओळख असलेल्या खाद्य पदार्थांचा आस्वाद चारही दिवस घेता येणार आहे.
या काळात ताटातील डावी बाजू सजविताना एक दिवस शेंगदाण्यापासून बनणार्या सातार्यातील प्रसिद्ध ‘म्हाद्या’ची चव खवैय्यांना मिळणार आहे. तर मावळ प्रांत, जावळीचे खोरे या भागात प्रसिद्ध असलेली काळ्या घेवड्याची आमटी देखील असणार आहे.
साहित्य उपक्रमांचा आनंद अनुभवत असतानाच रोज एका पक्वान्नाचा आस्वाद घेता येणार आहे. केशर-वेलचीयुक्त श्रीखंड, अस्सल खव्यापासून बनविलेले गुलाबजाम, अननसाचा शिरा आणि जिलबी यांचा समावेश भोजनात असणार आहे. तसेच आईस्क्रिम आणि कुल्फीची गोडी देखील चाखता येणार आहे.
सांगली, सातारा, कोल्हापूर भागात प्रसिद्ध असलेल्या सांगलीच्या खाद्य संस्कृती व्यवसायातील खरे कुटुंबातील दुसर्या आणि तिसर्या पिढीने अस्सल महाराष्ट्रीय तसेच सातारी चवीचे विशेष खाद्यपदार्थ तयार करण्याची जबाबदारी घेतली असून आचारी, मदतनीस असे तब्बल 225 कर्मचारी भोजन व्यवस्था सांभाळणार आहेत.
सातारा येथे आयोजित शतकपूर्व संमेलन सर्वच दृष्टीने सर्वोत्तम करण्याचा ध्यास घेतलेल्या आयोजकांनी संमेलनासाठी येणार्या साहित्यिक व साहित्यप्रेमींच्या भोजनाची व्यवस्थाही चोख ठेवली आहे. महाराष्ट्रीय खाद्य पदार्थ्यांच्या उत्तम चवीसाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या, अनेक संमेलनांचा अनुभव असलेल्या आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या पसंतीस उतरलेल्या खाद्य संस्कृतीतील व्यक्तींची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती भोजन समितीचे प्रमुख संजय माने तसेच वजिर नदाफ, राजेश जोशी यांनी दिली.

