दैनिक स्थैर्य | दि. २१ जानेवारी २०२४ | फलटण |
राजुरी (ता. फलटण) येथील साधूबुवा मंगल कार्यालयाजवळ दि. २० जानेवारी रोजी रात्री ८ वाजता उपळवे येथील स्वराज साखर कारखान्याला निघालेल्या उसाच्या दोन ट्रॉली अडवल्याप्रकरणी सुमारे १२ जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोपट विठोबा गावडे (वय ७५, राहणार गुणवरे, ता. फलटण) यांनी फिर्याद दिली आहे.
धनंजय बाळासो ठणके, गणेश शिवाजी साळुंखे, नितीन भानुदास, संजय दशरथ साळुंखे, सचिन वाघमोडे (सर्व राहणार मुंजवडी, तालुका फलटण), सुधाकर दामू माळवे, संभाजी गाडगे, किरण पवार, वैभव गावडे, राजू माळवे, चंदू इंगळे व नामदेव खटके (सर्व राहणार राजुरी, तालुका फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, साधू बुवा मंगल कार्यालय, राजुरी, तालुका फलटण गावच्या हद्दीत फिर्यादी पोपट गावडे यांचा जॉनडिअर कंपनीचा ट्रॅक्टर नंबर एम एच ११-७६०१ याबरोबर उसाची दोन ट्रॉली माळशिरस येथून उपळवे या ठिकाणी स्वराज कारखान्यात निघालेल्या असताना ‘तुला माहीत आहे ना, दरवाढीसाठी ऊस वाहतूक बंद आंदोलन सुरू आहे, तरी तू ऊस वाहतूक का करतोस’, असे म्हणून वरील आरोपींनी बेकायदा जमाव जमवून फिर्यादी यांना शिवीगाळ व काठीने व दगडाने मारहाण केली अशी तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी अधिक तपास पो. हवा. चांगण करत आहेत.