कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गट-तट बाजूला ठेवून वाई नगरपरिषदेची विशेष सभा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, वाई, दि.२९: भारतामध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. यावर महाराष्ट्र शासन विविध उपाययोजना करीत आहे. आपल्या सातारा जिल्हयातही कोरोनाचा कहर सुरू आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी सातारा जिल्हयात कडक लॉकडाउन केलेले आहे. या कोरानाचा पार्श्वभुमीवर आज वाई नगरपरिषदेची विशेष सभा व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे पार पडली. पहिल्यांदाच या कठीण परिस्थितीमध्ये दोन्ही आघाड्यांनी गट-तट न पाहता आज जे कोरोनाच्या रूपाने महाभयंकर संकट आलेले याला परतावून लावण्याबाबत विविध उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेवून दाखवून दिले की जेव्हा संकट येते तेव्हा आम्ही गट-तट न पाहता त्यावर मात कशी करता येईल हे पाहतो. यामुळे वाईतील नागरिकांच्या चेह-यावर नक्की समाधान दिसणार आहे.

आजची विशेष सभा नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष अनिल सावंत, मुख्याधिकारी सौ. विद्या पोळ, विरोधी पक्षनेते व नगरसेवक सतिश वैराट, नगरसेवक, संग्राम पवार, महेंद्र धनवे, भारत खामकर, कांताराम जाधव, किशोर बागुल, राजेश गुरव, रेश्मा जायगुडे, रूपाली बनारसे, प्रियांका डोंगरे, स्मिता बनकर, वासंती ढेकाणे, सुमैया इनामदार, शितल शिंदे, दिपक ओसवाल हे उपस्थित होते.

वाई येथील खानापूर मध्ये असलेल्या मॅप्रो कंपनीच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. यासाठी जिल्हा रुग्णालय सातारा व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून डॉक्टर, नर्सेस व आवश्यक तो स्टाफ पुरविण्यात आला आहे. सध्या वाई व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढल्याने वाई नगरपरिषदेने तेथे आतापर्यंत सुमारे २५ लाख रूपयांचे लिक्विड ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करून सुपुर्द केलेले आहेत. तेथील कोविड सेंटरला आवश्यक ती वैद्यकिय औषधे नगरपरिषदेने खरेदी करणेबाबत प्रस्ताव आलेला होता. यावर सर्वानुमते कोणतेही आडेवेडे न घेता औषधे वितरणासाठी स कोटेशन मागवून घेवून औषधे घेण्यास मंजुरी देवून यापुढील काळात आवश्यक ती मदत देण्याचीही ग्वाही नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभा शिंदे यांनी दिली.

घरातील कर्ता व्यक्ति किंवा कोणताही व्यक्ति जर मृत्युमुखी पडल्यावर त्या घरावर काय परिस्थिती निर्माण होते, ती काहीही केल्यावर त्याची भरपाई होत नाही. तसेच कोरोनामुळे जर व्यक्ति दगावली तर त्या कुटुंबावरही अशीच परिस्थिती येत असते. वाईचे उपाध्यक्ष अनिल सावंत व विरोधी पक्षनेते सतिश वैराट यांनी मागील सभेच्यावेळी असा विषय मांडला होता की, जर कोरोनाने वाईतील कोणतीही व्यक्ति दगावली तर त्याच्या अंत्यविधीचा खर्च नगरपरिषदेने करावा परंतु काही कारणास्तव या विषयाला संमत्ती मिळाली नाही. तदनंतर वाईतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही याप्रकारची मागणी केलेली होती. त्यामुळे या विशेष सभेत हा विषयही घेण्यात आलेला होता. यावर उपाध्यक्ष अनिल सावंत व विरोधी पक्षनेते सतिश वैराट यांनी सदरचा अंत्यविधीचा खर्च नगरपरिषदेवर न टाकता तिर्थक्षेत्र आघाडी व वाई विकास महाआघाडीमार्फत करण्यात येणार असल्याचे या दोघांनीही सांगितले.

वाई पोलीस स्टेशन व वाई नगरपरिषद यांनी वाईमध्ये विनाकारण तसेच विनामास्क फिरणा-यांवर कारवाई करून त्यांच्या दंडात्मक कारवाई केलेली होती. ही रक्कम वाई नगरपरिषदेकडे जमा करण्यात आलेली होती. तथापि वाई पोलीस स्टेशनने पत्राद्वारे वाई नगरपरिषदेकडे पोलीसांसाठी एन ९५ चे ५०० मास्क व ५० लिटर सॅनिटायझरची मागणी करण्यात आलेली होती. या विषयासही सत्वर मान्यता देण्यात आली व पोलीस स्टेशनने यापुढील काळातही अशाच प्रकारचे सहकार्य करावे, असेही वाई नगरपरिषदेमार्फत सांगण्यात आले. त्यामुळे आजची झालेली विशेष सर्वसाधारण सभेने गट तट न पाहता आलेल्या कोरोना विरोधातील लढाईत आम्हीही मागे नाही, आमचीही एकजुट आहे हेच दाखवून दिले.

भ्रष्टाचाराच्या आरोपांची होणार खातेनिहाय चौकशी
गेल्या दोन ते तीन दिवसामागे वर्तमानपत्र व नगरपरिषेकडे लेखी स्वरूपात वाईचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोप केलेले होते. यावरही आजच्या सभेत चर्चा होवून त्यावर येणा-या मिटींगमध्ये खातेनिहाय चौकशी होवून याचा अहवाल सादर करण्याबाबत नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभा शिंदे यांनी आदेश दिलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!