लवकर गुंतवणूक सुरू करण्यासाठी स्मार्ट निवड आवश्यक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ सप्टेंबर २०२२ । मुंबई । व्यक्ती त्याच्या/तिच्या गुंतवणूकीच्या प्रवासात अनेक चढ-उतारांमधून जात असते. प्रत्येक व्यक्तीची जोखीम आणि गुंतवणूक ही इतरांपेक्षा वेगळी असते. गुंतवणुकीच्या विविध पध्दती आहेत (जसे मूल्य आणि वाढ गुंतवणूक). गुंतवणूकदार बाजारपेठेतील स्थिती आणि वैयक्तिक प्राधान्यांच्या आधारे या पद्धतींचा अवलंब करू शकतात. सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी उत्तम लाभदायी मंत्र म्हणजे शक्य तितक्या लवकर गुंतवणूकीचा प्रवास सुरू करणे.

आधुनिक ब्रोकरेज हाऊसेसने निदर्शनास आणले आहे की, प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांपैकी ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूकदार (त्यांच्याशी संबंधित) ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. पोर्टफोलिओवर उच्च परतावा मिळविण्यासाठी व्यक्ती सर्वोत्तम गुंतवणूक निवडी करून लवकर गुंतवणूकीला सुरुवात करण्याची विविध कारणे आहेत. वयाच्या सुरूवातीच्या टप्प्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्रेरित करणाऱ्या काही टिप्स एंजेल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री प्रभाकर तिवारी यांनी दिल्या आहेत.

चक्रवाढीचा फायदा: सुरुवातीच्या गुंतवणूकीमुळे वैयक्तिक गुंतवणूकदाराला मिळणारा पहिला फायदा म्हणजे ‘कंपाऊंडिंग इफेक्ट’. सोप्या भाषेत सांगायचे तर कंपाऊंडिंग इफेक्ट हा उच्च परतावा मिळविण्याच्या गुंतवणूकीच्या क्षमतेला सादर करतो, जेथे एका वर्षाचे व्याज/लाभांश प्रारंभिक कॉर्पसमध्ये पुन्हा गुंतवले जाऊ शकतात. त्यामुळे, एखादे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गुंतवणूकीला उशीर करणे म्हणजे गुंतवणूकदाराला दर महिन्याला मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागतील. गुंतवणूकदार मासिक किंवा वार्षिक चक्रवाढ व्याजाचा निश्चित दर मिळवणारी पद्धतशीर गुंतवणूक योजना करतो तेव्हा निवृत्तीच्या नियोजनासाठी हे विशेषतः महत्वाचे असते. यासंदर्भात लवकर गुंतवणूकीला सुरूवात केल्यास शेवटी उच्च परतावा (व कॉर्पस) मिळेल.

उच्च जोखीम घेण्याची क्षमता: अनेक अभ्यासांनी पुष्टी केली आहे की, गुंतवणूकदाराची जोखीम घेण्याची क्षमता वयाच्या वाढीसह कमी होते. तसेच गुंतवणुकीवरील परताव्याच्या उच्च अपेक्षेशी उच्च जोखीम संबंधित असतात. गुंतवणूकदार लवकर गुंतवणूकीस सुरुवात करतो तेव्हा जोखीम घेण्याची क्षमता अधिक असते; म्हणून मल्टी-बॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते आणि विविध अपारंपरिक पर्यायांचा लाभ घेता येऊ शकतो. याव्यतिरिक्त कमी जबाबदाऱ्यांसह गुंतवणूकदार मर्यादित प्रारंभिक गुंतवणुकीतून योग्य परतावा मिळवण्यासाठी इक्विटीमध्ये किंवा अगदी एफअॅण्‍डओमध्ये व्यवहार करून उच्च जोखीम घेऊ शकतो.

करिअरच्या प्रगतीच्या सुरुवातीच्या काळात बचत व गुंतवणूकीच्या सवयी सुधारणे: स्टॉक मार्केट सिक्युरिटीज जसे इक्विटी शेअर्स आणि बाँड्समध्ये पद्धतशीरपणे किंवा एकरकमी गुंतवणूक सुरू केल्याने नुकतेच कमावण्यास सुरूवात केलेल्या तरुणांमध्ये बचत करण्याची स्मार्ट सवय लागू शकते. प्रथमच कमावण्यास सुरूवात केलेल्या तरूण व्यक्ती आयुष्यात पहिल्यांदाच त्यांच्या बँक खात्यांमध्ये नियमितपणे पैशांचा ओघ आल्याने भारावून जाऊ शकतात. गुंतवणूक लवकर सुरू केल्याने रोख प्रवाह हे प्राधान्य नसलेल्या वस्तू आणि खर्चावर खर्च करण्याऐवजी प्रभावीपणे व्यवस्थापित केला जातो याची खात्री मिळते. घर, किंवा कार खरेदी करणे आणि उच्च शिक्षणाचे नियोजन करणे अशी दीर्घकालीन उद्दिष्टे गाठण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन महत्त्वाचे आहे. वयाच्या सुरूवातीच्या काळात लवकर गुंतवणूक सुरू केल्याने सामान्यतः आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यावर येणारी आव्हाने कमी होण्याची खात्री मिळते.

पद्धतशीर आणि लहान प्रमाणात गुंतवणूक: व्यक्तीने नियोजित केलेल्या गुंतवणूकीचा कालावधी मोठा असल्यास दर महिन्याला किंवा आठवड्यात गुंतवणूकीची रक्कम कमी आणि गुंतवणूकदारांच्या सोयीनुसार असू शकते. गुंतवणूकदाराच्या मनात गुंतवणूकीबाबत काहीशी शाश्वती असते, त्यानुसार माहितीपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात. गुंतवणूकदार लवकर आणि बाजारपेठेतील कमी पद्धतशीर गुंतवणूकीसह तीच उद्दिष्टे साध्य करू शकतात. वयाच्या सुरूवातीच्या काळात लवकर गुंतवणूक सुरू करणे दीर्घकाळासाठी नेहमीच फायदेशीर असते.

सारांश: वयाच्या सुरूवातीच्या काळात लवकर गुंतवणूक सुरू करणारे गुंतवणूकदार अत्याधुनिक साधनांचा वापर करून सर्वसमावेशक बाजार विश्लेषण करू शकतात, जे मुलभूत आणि दुय्यम संशोधनावर आधारित माहिती देतात. व्यक्तीची क्षमता आणि आवश्यकतांनुसार गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे, पण लवकर सुरुवात केल्याने गुंतवणुकीची उद्दिष्टे साध्य करणे, बजेट तयार करणे आणि मालमत्तेमध्ये वैविध्यता आणणे याची निश्चितच खात्री मिळते. नियतकालिक रिबॅलन्सिंग आणि शेवटी उच्च परतावा मिळवणे हे इतर घटक आहेत, जे वयाच्या सुरूवातीच्या काळापासून गुंतवणूक सुरू करण्यास मदत करतात.


Back to top button
Don`t copy text!