
स्थैर्य, फलटण, दि. ०६ सप्टेंबर : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सहयोग फाउंडेशन व क्रांतीसुर्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.
‘रक्तदान, श्रेष्ठ दान’ या उक्तीप्रमाणे, स्वातंत्र्य दिनी देशसेवेची एक वेगळी भावना मनात ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील रक्ताची गरज ओळखून दोन्ही संस्थांनी उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद ठरले. अनेक तरुण आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या शिबिरात सहभागी होऊन आपले कर्तव्य बजावले.
या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सक्रिय सहभाग. फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, ‘आस्था टाईम्स’चे संपादक प्रा. दादासाहेब चोरमले, प्रा. डॉ. बाळासाहेब कांबळे, विनय नेवसे, शहाजी शिंदे आणि प्रकाश इनामदार यांनी स्वतः रक्तदान करून उपस्थितांना प्रेरणा दिली. यावेळी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि दोन्ही संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.