दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑगस्ट २०२२ । फलटण । महाराष्ट्रात मुद्रित वृत्तपत्रे, नियतकालिके, इलेक्ट्रॉनिक मिडीया प्रसारमाध्यमे, समाज माध्यमातील न्यूज पोर्टल्स यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात काम करणारे असंख्य पत्रकार वाढत आहेत. त्यात काम करणारे असंख्य पत्रकार व त्यांचे कुटुंबिय यांचे व त्यांच्या प्रसारमाध्यमांचे अनेक प्रश्न राज्यशासनात प्रलंबित आहेत. या सर्वांसाठी स्वतंत्रपणे काम करणारे पण स्वायत्त असे ‘महाराष्ट्र राज्य प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे विकास महामंडळ’ राज्यशासनाने त्वरित स्थापन करावे अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ यांच्या वार्षिक सभा नुकत्याच संपन्न झाल्या. त्यामध्ये मार्गदर्शन करताना रविंद्र बेडकिहाळ यांनी वरील मागणी केली. उपस्थित सर्व संपादक, पत्रकार यांनी या मागणीचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ले, ता.देवगड येथील पहिले स्मारक व त्यांचे सुशोभीकरण, द्वैवार्षिक तपासणीमधील किचकट अटी व लहान वृत्तपत्रांच्या कागदावरील जीएसटी रद्द कराव्यात, अ, ब, क गटातील वृत्तपत्रांना शासकीय जाहिराती देताना ‘अ’ व ‘ब’ गटातील वृत्तपत्रांपेक्षा 50 टक्के जाहिराती जादा द्याव्यात, सध्याच्या शासनमान्य जाहिरात दरात 100% दरवाढी द्यावी, आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील अर्थसहाय्यामध्ये रु.10 हजार रुपयांची वाढ करावी, सर्वच प्रकारातील प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या व निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांसाठी स्वतंत्र वेगळी आरोग्य व्यवस्था उपचार, तपासण्या, औषधे यासह मोफत सर्व शासकीय निमशासकीय व शासनमान्य धर्मादाय रुग्णालयातून तातडीने कॅशलेस सुविधा मिळाव्यात, विविध महामंडळाच्या व शासकीय विभागाच्या दर्शनी जाहिराती ‘क’ वर्गातील वृत्तपत्रांनाही प्राधान्याने मिळाव्यात, इत्यादी वृत्तपत्रे व पत्रकार यांच्यासाठी महत्त्वाच्या मागण्यांबाबतही या सभेत चर्चा करण्यात आल्या व याबाबतचे निवेदन तातडीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना समक्ष देण्यात यावे असाही निर्णय घेण्यात आला.
पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ
महाराष्ट्रातील सर्वच स्तरांवरील पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार, वयोवृद्ध पत्रकार, लघु वृत्तपत्रे यांच्या विविध प्रश्नांबाबत राज्य शासनाने समाजातील इतर घटकांच्या विकास महामंडळाप्रमाणे ‘महाराष्ट्र राज्य प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे विकास महामंडळ’ त्वरित स्थापन करावे या मागणीबाबत अधिक माहिती देताना रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या अखत्यारीतील शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी, प्रसारमाध्यम राज्य अधिस्वीकृती समिती, आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना समिती, पत्रकारांसाठीच्या विविध पुरस्कारांसाठीची समिती, शासनाच्या जाहिरात यादीवर घेण्यासाठी समिती इत्यादी सर्व समित्यांचे कामकाज या प्रस्तावित महामंडळाच्या एकाच नियंत्रणासाठी आणण्यात यावे. लघुवृत्तपत्रांना कमीत कमी व्याजदराने अर्थसहाय्य, जिल्ह्यातील गरजू बेघर पत्रकारांना गृहनिर्माणसाठी अर्थसहाय्य, प्रत्यक्ष क्षेत्रीय काम करणार्या पत्रकारांना, विशेषत: ग्रामीण भागातील सर्व पत्रकारांना भरघोस विमा संरक्षण, पत्रकारांच्या आरोग्याबाबत आजारांची संख्या वाढविणे व आर्थिक तरतूद 100 टक्के द्यावी, इत्यादि कल्याणकारी कामासाठी या महामंडळाला प्रारंभी रु.1 हजार कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद करावी व त्यानंतर दरवर्षी कायमस्वरुपी रु.500 कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद करावी अशी आपली प्रामुख्याने मागणी आहे. राज्यातील सर्व, विशेषत: मुंबईतील पत्रकार संघटनांनी याबाबत राज्यशासनाकडे आग्रही दबाव निर्माण करावा, असे आवाहनही रविंद्र बेडकिहाळ यांनी केले. राज्यातील प्रत्यक्ष कार्यरत असणार्या सर्व पत्रकार संघटनांच्या पदाधिकार्यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी व्यापक बैठक बोलवावी व त्यांच्या विधायक सूचना विचारात घेऊन राज्याचे असे या क्षेत्रातील प्रथमच रोल मॉडेल म्हणून देशात सर्वप्रथम असे हे महामंडळ कार्यान्वित करावे, अशीही अपेक्षा बेडकिहाळ यांनी व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव नलवडे यांच्यावतीने उपस्थित सदस्यांना रविंद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते सद्गुरु वामनराव पै यांच्या जीवनविद्येचे तत्वज्ञान सांगणार्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपाकक सहकारी संघाचे पदाधिकारी कृष्णा शेवडीकर (नांदेड), विजय मांडके (सातारा), रमेश खोत (जालना), सौ.अलका बेडकिहाळ (फलटण), सौ.विमल नलावडे, विठ्ठलराव नलावडे (कोरेगाव), माधवराव पवार (नांदेड), सौ.एम.बी.वाणी, बाळकृष्ण वाणी (जळगाव), बबनराव सोनवणे, मधुकर महाले (औरंगाबाद), डॉ.महादेव सगरे, गजानन पारखे (पुणे), भारद्वाज बेडकिहाळ (फलटण), प्रसिद्ध आपत्ती निवारण तज्ज्ञ जयपाल पाटील (अलिबाग) यांचेसह विविध भागातील लहान वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार यावेळी उपस्थित होते. दोन्ही संस्थांच्यावतीने महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे प्रशासकीय संचालक अमर शेंडे यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत व आभार मानले.