फलटणच्या अभ्यासकाला महाबळेश्वरात सापडला ऐतिहासिक ठेवा

विहिरीमध्ये तलवारीची मूठ अन् वस्तू


दैनिक स्थैर्य । 13 मे 2025। सातारा । फलटण येथील अभ्यासक मयुरेश मोरे व स्थानिक जाणकार राहुल कदम यांना श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ऐतिहासिक व पुरातन वास्तूंचा अभ्यास करत असताना एका जुन्या विहिरीमध्ये (आड/बावडी) मराठा धोप या प्रकारच्या तलवारीची मूठ व इतर पुरातन वस्तू सापडल्या.

इंडियन आर्म्स अ‍ॅक्टनंतर ब्रिटिशांनी अनेक शस्त्रे जप्त करून नष्ट केली. त्यातून वाचलेली शस्त्रे अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा आहेत. मराठ्यांनी युद्धनीती व शस्त्रास्त्रांचा भ्यास करून धोप या प्रकारच्या तलवारी बनवल्या. या तलवारींसाठी फ्रेंच, पोर्तुगीज या देशातील बनावटीचे पाते वापरत असल्यामुळे फिरंगी देखील म्हणत असत. हे पोलाद उच्च दर्जाचे असत. या तलवारींचे दोन उपप्रकार आहेत. पहिला प्रकार वक्र धोप असून, त्याचे पाते, टोकाचा भाग थोडा वक्र असतो. दुसरा सरळ धोप असून, त्याचे पाते सरळ असते.क्षेत्र महाबळेश्वर येथे सापडलेली ही ऐतिहासिक ठेव दुर्मिळ आहे, हे लक्षात येताच राहुल कदम यांनी याची माहिती गावातील काही प्रमुख व्यक्तींना दिली. धनेश वाडेकर यांनी वाईचेप्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांना याबाबत कल्पना दिली. त्यानंतर तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्यासह सातारा युवाराज्य फाउंडेशन अध्यक्ष महारुद्र तिकुंडे, सुभाष गायकवाड, रोहन ढाणे यांचे पथक श्री क्षेत्र महाबळेश्वरमध्ये दाखल झाले.
महाबळेश्वर ट्रेकर्सच्या साह्याने जयवंत बिरामणे आणि अनिल लांगी यांनी या ऐतिहासिक वस्तू विहिरीतून बाहेर काढल्या. यावेळी धनेश वाडेकर, प्रशांत कात्रट, नीलेश धनावडे, आनंद ढेबे, महेश लांगी, संकेत लांगी आदी स्थानिक उपस्थित होते. अशा ऐतिहासिक वस्तूंच्या माध्यमातून इतिहासाची अनेक दडलेली पाने उघडले जाऊ शकतात, असे अभिरक्षक शिंदे यांनी सांगितले.
सापडलेल्या मुठीविषयी…

  • नख्या : मूठ व पाते जोडण्यासाठी मारलेले रिबिट
  • ठोला : तलवारीवरती येणारे वार अडवणारा भाग
  • परज : मुठीसमोर बोटांचे संरक्षण करणारा भाग
  • कटोरी : मुठीखालील भाग अर्धवक्र व खोलगट असल्याने इजा होत नसे.
  • गज : मुठीपासून खाली व वक्र निमुळता भाग म्हणजे गज. त्यामुळे तलवारीच्या वजनाचा समतोल होतो. मोगरा, कंगणी, जनेऊ, कंठी, कडी, चौक असे अनेक मुठीचे भाग असतात.

या तलवारी घोडदळासाठीवापरल्या जात असत, याची लांबी चार फूट असून, शत्रूला भोकसण्यासाठी हे शस्त्र वापरले जाते. या तलवारी 350 वर्षांपूर्वी शिवकालीन मराठा कालखंडात बनवलेल्या आहेत. या फिरंगी पात्यांना मराठ्यांनी युद्धामध्ये जास्त काळ टिकण्यासाठी व हाताला इजा न करणारी मूठ बनवली व याचा समतोल उत्तम केला आहे.
– राहुल कदम, इतिहास जाणकार


Back to top button
Don`t copy text!