
स्थैर्य, 2 फेब्रुवारी, सातारा : बारामती येथील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत असलेले सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही कर्तव्य बजावताना मृत्यू झाला. त्यानंतर पवार कुटुंबीयांच्या वतीने आमदार रोहित पवार यांनी आज दुपारी तरडगाव येथे येऊन जाधव कुटुंबीयांच्या घरी येऊन त्यांचे सांत्वन केले, तसेच विदीप यांच्या मुलांची संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी घेण्याचीही ग्वाही दिली.
विदीप जाधव हे मूळचे तरडगावचे. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षारक्षक म्हणून कर्तव्य बजावत असतानाच, त्यांचाही बारामतीतील विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्यावर तरडगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुर्दैवी घटनेमुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.आमदार रोहित पवार यांनी विदीप यांची मुलगी नेत्रा आणि चिरंजीव अद्विक यांना जवळ बोलावून घेतले. त्यांचा हात हातात घेत, तुम्ही कोणत्या इयत्तेमध्ये शिकता असे विचारले. त्यानंतर तुम्ही कोणतीही शाळा ठरवा. मराठी वा इंग्लिश मीडियम स्कूल असो त्या शाळेमध्ये तुमच्या सर्व शिक्षणाची सोय आम्ही पवार कुटुंबीयांकडून करू. जाधव परिवाराच्या अडीअडचणींसाठी आम्ही सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, कोणत्याही प्रकारची मदत लागू, आम्ही ती करण्याचा प्रयत्न करू, असेही श्री. पवार यांनी यावेळी त्यांना सांगितले.त्यामुळे अनेक राजकीय व्यक्तींनी त्यांच्या घरी भेट देत सांत्वन केले.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी तरडगाव येथील जाधव कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली. एकुलत्या एक मुलाच्या आयुष्याचा असा अंत झाल्याने आई-वडील व पत्नीसह कुटुंबीय मोठ्या प्रमाणात खचले असताना, श्री. पवार यांनी विदीपचे वडील दिलीपराव व आई, पत्नी संध्या यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांची मुलगी नेत्रा व चिरंजीव अद्विक यांना जवळ बोलावून या दुःखातून आपण कसे सावरले पाहिजे, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत त्यांच्याशी संवाद साधला.
पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडूनही सांत्वन..
मागील दोन दिवसांपासून अनेक नेते मंडळी विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनीही जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, विदीपचे चुलते संजय जाधव, सुरेंद्र कुमार घाडगे, गोविंद पवार आदी उपस्थित होते.
