
दैनिक स्थैर्य । 3 मे 2025। सातारा । महाराष्ट्र दिनी सातारा शहरात गेल्या अडीच दशकांपासून साजरा होणार्या गुलमोहर डेची परंपरा यंदाही राखण्यात आली. येथील सेंट थॉमस चर्च परिसरात विविध उपक्रमांद्वारे गुलमोहर डे उत्साहात साजरा करण्यात आला. चिमुकल्यांच्या हस्ते गुलमोहराच्या झाडाला पाणी घालण्यात आले. प्रसिद्ध कलाकार, कवी, रंगकर्मी, चित्रकारांनी या कार्यक्रमात विविध रंगांची उधळण केली.
सोहेल सय्यद (फलटण), राहुल सुतार (इचलकरंजी) यांच्या निसर्गचित्रांनी नागरिकाचे लक्ष वेधून घेतले. रखरखत्या उन्हात रस्त्याकडेचा लाल, पिवळा, निळसर, जांभळा गुलमोहर फुललेला पाहून मनाला गारवा मिळतो. उन्हाळ्यात लालभडक रंगाने रंगलेला गुलमोहर लोकांचे लक्ष वेधून घेतो, असा विचार पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला.
या महोत्सवात 35 कलाकारांनी भाग घेतला होता. कविता, चारोळ्या, चित्रकला, शिल्पकला यामुळे महोत्सव बहारदार झाला. शिल्पकार रवी कुंभार यांनी चित्रकला आणि शिल्पकलेचे प्रात्यक्षिक दाखवले. बालगोपाळांची चित्रकला स्पर्धा आणि बक्षीस वितरण उत्साहात झाले. निसर्ग आणि मानवी संवेदना यांचे नाते अतूट असल्याची जाणीव आजच्या पिढीला व्हावी, हा गुलमोहर डेचा उद्देश असल्याचे कार्यक्रमाचे संयोजक कबीर गायकवाड यांनी सांगितले.