दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
सर्व बक्षीसपात्र बसस्थानकांबरोबरच इतर सर्व बसस्थानकांनी प्रवासी सेवा व प्रवासी सोयीसुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीनिवास जोशी यांनी केले.
सातारा येथील विभागीय कार्यालयात राज्य परिवहन महामंडळ अध्यक्षांच्या निर्देशानुसार हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ अभियान स्पर्धेतील पुणे प्रादेशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवलेल्या व दहा लाखांचे बक्षीस पटकावलेल्या फलटण बसस्थानकास मुंबई प्रदेशाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीनिवास जोशी, पुणे प्रदेशाच्या प्रादेशिक व्यवस्थापिका श्रीमती यामिनी जोशी यांच्या हस्ते फलटण आगाराच्या आगार व्यवस्थापिका सोफिया मुल्ला, विभाग नियंत्रक रोहन पलंगे, विभागीय वाहतूक अधीक्षक तथा कामगार अधिकारी श्रीमती रेश्मा गाडेकर, तत्कालीन प्रभारी आगार व्यवस्थापक व सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक रोहित नाईक, वरिष्ठ लिपिक कुलदीप चव्हाण यांना पारितोषिक रक्कम रु. १० लाखांच्या धनादेशाची प्रतिकृती, प्रशस्तीपत्रक व चषक देऊन गौरविण्यात आले.
फलटण आगारात चषक व धनादेशाची प्रतिकृती आल्यानंतर फलटण आगारातील सर्व कर्मचारी बंधू-भगिनी, पर्यवेक्षक यांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला.
यावेळी बोलताना आगार व्यवस्थापिका सोफिया मुल्ला व सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक रोहित नाईक यांनी फलटण आगारातील सर्व चालक, वाहक, यांत्रिक, पर्यवेक्षक, प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे व सर्व प्रायोजक यांच्यामुळे फलटण आगारास सदर अभियानात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन करता आल्याचे नमूद केले. तसेच हे अभियान इथे संपत नसून ‘अंत: अस्थि प्रारंभ:’ या उक्तीनुसार हीच खर्या अर्थाने स्वच्छतेच्या अभियानाची सुरुवात असल्याचे नाईक यांनी प्राधान्याने नमूद करत भावी वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्थानकप्रमुख राहुल वाघमोडे, वाहतूक निरीक्षक सुहास कोरडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज अहिवळे, सुखदेव अहिवळे व बहुसंख्य कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होत्या.